विरोधी पक्ष नेते पदासाठी भाजपचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय - BJP To Appeal in Supreme Court for Leader Of Opposition post in BMC | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधी पक्ष नेते पदासाठी भाजपचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर भारतीय जनता पक्षाने केलेला दावा, उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.  मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडेच राहणार यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या पदावर काँग्रेसचे रवी राजाच राहणार हे स्पष्ट झाले आहे. त्याच्या विरोधात भाजपा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे

मुंबई : महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पद कॉंग्रेसकडे कायम ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला भाजप सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्‍वासाच्या ठरावालाही धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर भारतीय जनता पक्षाने केलेला दावा, उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.  मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडेच राहणार यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या पदावर काँग्रेसचे रवी राजाच राहणार हे स्पष्ट झाले आहे.

मुंबई महापालिकेत २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता असताना गेल्या काळात भाजप हा शिवसेनेचा मित्रपक्ष होता. २०१४ मध्ये केंद्रात सत्ता येताच भाजपने मुंबईत हातपाय पसरायला सुरुवात केली. शिवसेना व भाजप यांनी २०१७ मधील महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे ८५ आणि भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले. 

त्यानंतर महापौरांच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. भाजप पहारेकऱ्याची भूमिका बजावेल; विरोधी पक्षात बसणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे आले. या पदावर रवी राजा यांची नियुक्ती झाली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर  विधानसभेत भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात भाजपने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला

महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. राज्यात युतीची सत्ता असली तरी महापालिकेत शिवसेना, भाजप एकत्र नव्हते. मात्र, भाजपने विरोधी पक्ष नेते पदावरही दावा सांगितला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या कॉंग्रेस पक्षाला हे पद मिळाले. मात्र, राज्यात महाआघाडी स्थापन झाल्यावर भाजपने विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा दावा फेटाळून लावला. 

त्यावर भाजपने न्यायालयात दाद मागितली. मुंबई उच्च न्यायालयानेही भाजपचा हा दावा नाकारला असून कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते पद कायम ठेवले आहे. या विरोधात आता भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नगरसेवक आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली. दरम्यान, विरोधी पक्ष नेते पदासाठी मुंबई महापालिकेत काही दिवसांपासून वातावरण तापले आहे.

अविश्‍वास ठरावाला धक्का?
भाजपने महापौरांविरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडला आहे. मात्र उच्च न्यायालयाने भाजपचा विरोधी पक्ष नेते पद देण्याच्या मागणीचा दावा फेटाळला आहे. या निर्णयामुळे अविश्‍वास ठरावालाही धक्का बसण्याची शक्‍यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख