संजय राऊतांच्या राज्यपालांना शुभेच्छा; पण या रिटर्न गिफ्टची अपेक्षा!  - Birthday whish to Governor Bhagat Singh Koshyari from MP Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

संजय राऊतांच्या राज्यपालांना शुभेच्छा; पण या रिटर्न गिफ्टची अपेक्षा! 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 जून 2021

शिवसेना नेत्यांनीही कोश्यारी यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शिवसेना नेत्यांनीही कोश्यारी यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्या शुभेच्छा देताना राऊत यांनी राज्यपालांकडून १२ आमदारांच्या नियुक्तीची गोड भेट मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  (Birthday whish to Governor Bhagat Singh Koshyari from MP Sanjay Raut)

राज्यपाल कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. आज सकाळीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शुभेच्छा देऊन आले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शुभेच्छा देण्यासाठी राजभवन गाठले. त्यांच्या या राजभवन भेटीची राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत असताना शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात संजय राऊत यांचाही समावेश आहे.

हेही वाचा :  काँग्रेस-शिवसेना नेत्यांच्या दौऱ्यानंतर आता अजित पवार उद्या बीडमध्ये 

शुभेच्छा देताना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधान परिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच, तो तसाच राहील. जय महाराष्ट्र! 

ह्या शुभेच्छा देत असताना राऊत यांनी राज्यपालांकडून गोड भेटीची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेच्या १२ जागांचा विषय छेडला आहे. रखडलेली ही बारा सदस्यांची नियुक्ती मार्गी लावावी आणि महाराष्ट्राला एक गोड भेट द्यावी, अशी मागणीही राऊत यांनी या शुभेच्छांच्या आडून राज्यपालांकडे केली आहे.

विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीवरून हेच संजय राऊत राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधत असतात. राज्यपालांनी राजधर्माचे पालन करावे, अशी आठवणही ते करून देत असतात. याच विषयावरून राऊत यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलेले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांनी इतर प्रश्नांसोबतच विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा त्यांनी मोदींसमोर उपस्थित केला होता. तसेच, आजही मुख्यमंत्र्यांनी कोश्यारी यांना भेटून एवढे दिवस असलेली कटूता संपविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. त्यामुळे बारा आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग या भेटीनंतर तर मोकळा होतो की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख