भास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट

जाधव यांच्यावर कठोर टीका
Chiplun flood
Chiplun flood

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूणचा पूरपाहणी दौरा आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या उद्धटपणामुळे वेगळ्या अर्थाने चर्चेत आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या चिपळूण दौऱ्यात (Chiplun flood) नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असताना तेथील व्यापाऱ्यांनी गाऱ्हाणी मांडली. एका महिलेने टाहो फोडला. या दरम्यान, काही व्यापारी आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात शाद्बिक चकमक उडाल्याने वृत्त देत काही दूरचित्रवाहिन्यांनी त्याचा व्हिडिओही प्रसारित केला.

भर बाजारपेठेत एक महिला पुरात तिच्या घराचे नुकसान झाल्याचे ओरडून सांगत होती. तिचा आक्रोश ऐकून मुख्यमंत्री थोडावेळ थांबले. तिचे म्हणणं ऐकून घेतले आणि सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या वेळी या महिलेने तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या, असं सांगितलं. या महिलेच्या या उद्गाराने भास्कर जाधव चिडले आणि त्यांनी लगेच या महिलेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला… बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असे भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.

भास्कर जाधवांचा ही वर्तणूक दूरचित्रवाहिन्यांवर पाहिल्यानंतर त्यांच्यावर टीका करणारे पोस्ट व्हायरल झाल्या. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी याविषयी सविस्तर लिहिले आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात...

चिपळूणमध्ये वेदना संतप्तपणे सांगणाऱ्या त्या महिलेची मुख्यमंत्री समजूत काढत आहेत. ऐकून घेत आहेत. भास्कर जाधव मात्र नाराज झालेत आणि हातवारे करून उग्रपणे बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे असे उग्र मध्यस्थ न घेता जनतेची भेट घ्यावी, त्यांना बऱ्याच गोष्टी कळतील. कदाचित त्या ताईंची बोलण्याची पद्धत चुकली असेल. त्या थोड्याच विधानसभेत बसून सभ्यता शिकल्यात? नेत्यांसमोर खाली मान घालूनच बोलावं अशी जाधवांची अपेक्षा असणार कारण उद्धवजी त्यांचे नेते आहेत.  
भास्कर जाधव को गुस्सा क्यों आया? त्यांचंच नाही तर कोकणातल्या तमाम नेत्यांचं अपयश उघड झालंय. जनतेत आक्रोश आहे. मुख्यमंत्र्यांसमोर आता ही बाई काय काय सांगते याचा तणाव भास्कर जाधवांवर असणार. पुढचं करीयर बिघडलं तर काय? पूर आज आहे उद्या जाईल. सामान्य माणूस आज जमिनीवर आहे, उद्या पुरात वाहून जाईल. त्यात काही विशेष नाही पण राजकीय करीयरचं काय हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. 

खरं म्हणजे भास्कर जाधवांच्या गाठीशी मोठा पूर्वानुभव आहे. कोणत्याही प्रसंगात त्यांच्या राजकीय करीअरला धक्का लागत नाही याचा अनुभव आहेच. मागे दुष्काळात त्यांनी कन्येचं लग्न एवढं मोठं आणि धडाक्यात केलं होतं की खुद्द शरद पवार साहेबांना त्या रात्री झोप लागली नव्हती असं त्यांनी सार्वजनिकरित्या सांगितलं होतं. तरी त्यांच्या करिअरला धक्का लागला नव्हता. आताही तो धोका नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांची 'कानउघडणी' केली अशी बातमी येऊन वातावरण शांत होणारंच आहे. भ्रष्टाचारासाठी जेलमध्ये गेलेल्यांच्या राजकीय करीअरचं सुद्धा जिथं काही वाकडं होत नाही तिथं जनतेशी असंवेदनशीलता हा अदखलपात्र गुन्हा असतो हे त्यांना कळायला पाहिजे होतं.    भ्रष्टाचारामुळे जेलमध्ये गेलेले परत आले की मंत्री होतात इतकी आपली लोकशाही उदार आहे. घटनेत तरतूद असती तर त्यांनी जेलमधूनही कारभार चालवून लोकांची अखंड सेवा केलीच असती. मुद्दा असा आहे की इतकी वर्ष कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून 'जनसेवेत' असलेल्या भास्कर जाधवांनी त्या महिलेकडे अजून एकदा दुर्लक्ष केलं असतं तरी काही बिघडलं नसतं. पण त्यांना कदाचित राग यासाठी आला असावा की 'जनता गुलाम आणि आपण मालक' हे समीकरण त्यांच्या मेंदूत घट्ट बसलं असणार. महिलेशी वाईट बोलणं हा काही दखलपात्र गुन्हा नाही. परवा लाॅकडाऊनमध्ये इतरांसाठी मंदीर बंद असतांना मंत्र्यांनी आरती केल्याची बातमी होती. ठाकरे सरकार अतिशय शिस्तप्रिय असल्यानं मंत्र्यांसोबतच्या कार्यकर्त्यांवर तातडीनं कारवाई झाली. या असंवेदनशीलतेवरही कदाचित हाच उपाय करता येईल. भास्कर जाधवांच्या चार पाच कार्यकर्त्यांना खडसावलं पाहिजे. 

पूर येईल आणि जाईल. जनता जगेल किंवा वाहून जाईल. शाश्वत आहेत  फक्त नेते आणि राजकारण. ते पुढे जात राहिलं पाहिजे.
ता.क.: आत्ताच 2020 चा एक व्हीडीओ पाहण्यात आला ज्यामध्ये भास्कर जाधव एका मंदिरात गावकऱ्यांना आयमाय वरून शिव्या देत आहेत. शिव्या ऐकवत नाहीत. मात्र ते अधूनमधून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष असतात त्यामुळे आपण त्यांचा आदर केला पाहिजे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक पेजवरही भास्कर जाधव यांच्यावर कठोर टिका करणाऱ्या पोस्ट आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com