राणेंच्या कार्यकर्त्यांनी 'बोलेरो'साठी घेतलेले कर्ज न फेडल्याने बॅंकेच्या नोटिसा  - Bank notices for non-payment of loans taken by Rane's activists for 'Bolero' | Politics Marathi News - Sarkarnama

राणेंच्या कार्यकर्त्यांनी 'बोलेरो'साठी घेतलेले कर्ज न फेडल्याने बॅंकेच्या नोटिसा 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

निवडणूक आयोगाने या गाड्या जप्त करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले होते.

कणकवली : लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तोंडावर राणेंच्या कार्यकर्त्यांनी एकाच वेळी 13 बोलेरो गाड्या खरेदी केल्या होत्या. त्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड अद्याप झालेली नाही. त्यामुळे विरोधक तथा बोलेरो गाड्यांचे खरेदीदार आणि जामीनदार जप्तीच्या कचाट्यात सापडले आहेत, असा दावा आमदार वैभव नाईक यांनी आज (ता. 1 डिसेंबर) केला. 

बोलेरो गाड्यांचे खरेदीदार आणि जामीनदार यांना सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेने जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटिसांमुळे चिडलेले विरोधकांचे कार्यकर्ते आता जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, कितीही टीका झाली तरी शिवसेना सावंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही आमदार नाईक यांनी दिली. 

येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नाईक बोलत होते. ते म्हणाले, "निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकाच वेळी 13 बोलेरो गाड्यांची खरेदी झाल्याने निवडणूक आयोगाने या गाड्या जप्त करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या.

या गाड्‌यांसाठी जिल्हा बॅंकेकडून कर्ज उचल झाली असून विरोधकांचे कार्यकर्ते हेच या गाड्यांचे खरेदीदार आणि जामीनदार आहेत. गेल्या सहा वर्षात बोलेरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणाची परतफेड झालेली नाही. या कर्जप्रकरणी जप्तीच्या नोटिसा गेल्याने संबंधित कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.'' 

दरम्यान, जिल्हा बॅंकेवर आरोप करणाऱ्या भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेत यावे. तेथील संपूर्ण पारदर्शक कारभार सतीश सावंत हे निश्‍चितपणे त्यांना दाखवतील. जिल्हा बॅंकेची संपूर्ण पाहणी झाल्यानंतरच चव्हाण यांनी बॅंकेबाबत आपले मत मांडावे, असे आवाहनही नाईक यांनी चव्हाण यांना केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख