मंत्र्यांना वाचवा बाईला नाचवा, सरकारचा संतापजनक कार्यक्रम... - Atul Bhtkhalkar Lashes out at Government over Jalgaon Hostel issue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

मंत्र्यांना वाचवा बाईला नाचवा, सरकारचा संतापजनक कार्यक्रम...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मार्च 2021

मंत्र्यांना वाचवा आणि बाईला नाचवा, हा महाविकास आघाडी सरकारचा अधिकृत कार्यक्रम आहे का, अशी शंका येऊ लागली आहे, अशी जळजळीत टीका भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

मुंबई : जळगावच्या शासकीय वसतीगृहातील मुलींना पोलिसांनीच कपडे काढून नाचायला लावल्याचे उघड झाल्याने, मंत्र्यांना वाचवा आणि बाईला नाचवा, हा महाविकास आघाडी सरकारचा अधिकृत कार्यक्रम आहे का, अशी शंका येऊ लागली आहे, अशी जळजळीत टीका भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

नुकत्याच उघड झालेल्या या प्रकाराबाबत गृहमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे. पण त्याखेरीज सारेकाही शांत असून मुख्यमंत्र्यांच्या तर नाकावरील माशीदेखील हलली नसल्याचे चित्र आहे. असहाय महिलांचा अशा प्रकारे गैरफायदा घेणाऱ्या या हैवानांना तत्काळ पोलिस कोठडीत घेणे गरजेचे आहे. मात्र मंत्र्यांना वाचवा अन बाईला नाचवा हेच या सरकारचे अधिकृत धोरण झाले असल्याने, त्यांच्याकडून फारशी अपेक्षाही करता येत नाही, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.  

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सतत घडत आहेत. त्याबाबत सरकारने लाजलज्जाही कोळून प्यायल्याचे दिसत आहे. तीन पक्षांमधील गावावरून ओवाळून टाकलेले गुंड एकत्र आल्यावर राज्यातील महिला सुरक्षित कशा राहणार, असा प्रश्न विचारून भातखळकर पुढे म्हणतात की, एक मंत्री महिलेची फसवणुक करतो, दुसरा मंत्री आपल्या दुसऱ्या बायकोबाबत जनतेची फसवणुक करतो, असे प्रकार सुरु आहेत. सरकारच मंत्र्यांना वाचवते असे दिसल्याने गुंडांबरोबरच आता पोलिसही महिलांवर अत्याचार करू लागले आहेत. कोणालाही कोणाचाही धाक उरला नसल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची गरज आहे. तरच महिला राज्यात निर्धास्तपणे वावरू शकतील, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

हे सरकार आणखी किती खालच्या पातळीवर जाणार याची कल्पना फक्त त्यांनीच करावी. मात्र शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आम्ही तसे होऊ देणार नाही. राज्यातल्या आयाबहिणींच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व ते मार्ग वापरू, असेही भातखळकर म्हणाले. एरवी उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांच्या घटनांवरून महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांच्या मोठमोठ्या महिला नेत्या महाराष्ट्रात निषेध नोंदवण्याची नाटके करतात. मात्र आपल्याच राज्यातील माताभगिनींविषयी त्यांना थोडातरी कळवळा असेल किंवा या घटनांबाबत थोडीतरी लाज वाटत असेल तर त्यांनी आपल्याच सरकारला जळगावच्या घटनेबाबत कठोर कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख