घरात उकीरडा आणि जगाला शिकवतात शहाणपण : अतुल भातखळकरांचा टोला - Atul Bhatkhalkar Takes on NCP over Dhananjay Munde and Nawab Malik Issue | Politics Marathi News - Sarkarnama

घरात उकीरडा आणि जगाला शिकवतात शहाणपण : अतुल भातखळकरांचा टोला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप आणि नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक, या दोन्ही प्रकरणांवरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप आणि नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक, या दोन्ही प्रकरणांवरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला होता. तक्रारदार तरुणीच्या बहिणीशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असेही मुंडेंनी स्पष्ट केले होते. 

एनसीबीने वांद्रे पश्चिममधून एका कुरियरकडून गांजा जप्त केला होता. या चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, खारमधील करण सजनानी याच्या घरी छापा टाकण्यात आला होता. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी सजनानी, राहिला फर्निचरवाला, शाहिस्ता फर्निचरवाला आणि रामकुमार तिवारी यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात समीर खान यांचे नाव समोर आले होते. त्यांना आज चौकशीसाठी एनसीबीने बोलावले होते. चौकशी झाल्यानंतर एनसीबीने त्यांना अटक केली. 

या दोन्ही प्रकरणांवरुन भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ''मुंडे, मालिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा की. जोरदार समर्थन करा आणि यात केंद्र सरकार कसे दोषी आहे हेही सांगा...लोक आतुरतेने वाट पाहतायत,'' असा चिमटाही भातखळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना उद्देशून काढला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे प्रकरणाबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''धनंजय मुंडे यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा राजकारणाचा मुद्द्या होऊ शकत नाही. मुंडेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य निर्णय घेतील. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येईल हा भ्रम आहे,'' असे राऊत म्हणालेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख