मनाने अन्य राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेत रेंगाळणाऱ्या गृहमंत्र्यांनी राज्यात परतावे - भातखळकर - Atul Bhatkhalkar Criticizes Uddhav Thackeray and Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

मनाने अन्य राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेत रेंगाळणाऱ्या गृहमंत्र्यांनी राज्यात परतावे - भातखळकर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

पुण्यात पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात काल एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या खळबळजनक घटनेनंतर अतुल भातखळकर यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. 

पुणे :  राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत... मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडण्याची आणि मनाने कायम अन्य राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेत रेंगाळणाऱ्या गृहमंत्र्यांनी राज्यात परतण्याची आवश्यकता आहे, असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे व अनिल देशमुख यांना उद्देशून लगावला आहे.

पुण्यात पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात काल एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या खळबळजनक घटनेनंतर अतुल भातखळकर यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात खुनाच्या घटना सतत घडत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात चार दिवसांपूर्वीच युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांचा खून झाला आहे. त्यातील सर्व आरोपींना अटक करून पोलिस निष्कर्षापर्यंत येण्याआधीच आज पोलिसांसमोर पुन्हा नवीन प्रकरण वाढून ठेवले गेले आहे. खराडी येथे एका सराईत गुन्हेगाराचा सोमवारी सकाळी दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली. खराडीतील खुनाची घटना ताजी असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असणाऱ्या स्टेट बॅंकेजवळील पदपथावर एका ६० वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.

भातखळकर यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरुनही गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 'राज्यात आत्तापर्यंत २४,१५० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून २५१ कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत... गृहमंत्र्यांनी अन्य राज्यातील कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या आरोग्याची चिंता करावी... आपण हसे लोकाला कोरोना आपल्या खात्याला...' असा चिमटा भातखळकर यांनी देशमुख यांना उद्देशून केलेल्या ट्वीटद्वारे काढला आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख