मुंबई : पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या ताज हाॅटेलला दंडाच्या रकमेत सूट देण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी कोरडे ओढले आहेत. महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला... तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???...वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!! असे म्हणत शेलार यांनी सेनेवर टीका केली आहे.
टाटांच्या हाँटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने "बीएसई" वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय.
महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला...
तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???...वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 4, 2021
ताज हॉटेलला सुमारे नऊ कोटी रुपये दंड माफ करणाऱ्या महापालिकेने मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर (बीएसई) कारवाईचा बडगा उगारला आहे. यावरुन पालिकेवर व सत्ताधारी शिवसेनेवर टीका होत आहे. पालिकेने 'बीएसई'ला दोन कोटी रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. तर ट्रायडंट हॉटेलला नोटिसा बजावून नमते घेण्यास प्रशासनाने भाग पाडले आहे. ट्रायडंट हॉटेलने आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी २० लाख रुपये भरून आपली सुटका करून घेतली.
ताज आणि नरीमन पॉइंट परिसरातील ट्रायडंट हॉटेलच्या बाहेरील रस्ते आणि पदपथ सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी बंद केले होते. ताज हॉटेलने बंद केलेल्या पदपथांवर झाडाच्या कुंड्या, तसेच आपले काही साहित्य ठेवून अतिक्रमण केले होते. त्यामुळे पालिकेने हॉटेलला ८ कोटी ८५ लाख रुपये दंड ठोठावला होता. गेली पाच वर्षे सुरू असलेल्या या वादावर अखेर दंडमाफी करून पालिकेने पडदा टाकला.
'बीएसई'लाही सार्वजनिक जागा व्यापल्याबद्दल दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बीएसईला दरमहा भाड्यापोटी दोन लाख १२ हजार याप्रमाणे चार कोटी रुपये दंड, तसेच १५ टक्के व्याजापोटी ६० लाखांहून अधिक रक्कम भरण्यास सांगण्यात आली होती. नंतर बीएसईला दोन कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला.
Edited By - Amit Golwalkar

