आता पुढे काय...? दाऊदला पालिकेचे टेंडर अन पाकिस्तानसोबत टक्केवारी का?  - Ashish Shelar criticizes Shiv Sena for beating retired Navy officer | Politics Marathi News - Sarkarnama

आता पुढे काय...? दाऊदला पालिकेचे टेंडर अन पाकिस्तानसोबत टक्केवारी का? 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंग्यचित्र फॉरवर्ड केल्याबद्दल कांदिवली येथील सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा (वय 65) यांना शिवसैनिकांनी मारहाण केली आहे.

मुंबई : "कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री...टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगनाचे घर तोडलेत... आणि आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण..! निषेध....!! पुढे काय? दाऊदला मुंबई पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी काय?, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार ऍड आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंग्यचित्र फॉरवर्ड केल्याबद्दल कांदिवली येथील सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा (वय 65) यांना शिवसैनिकांनी मारहाण केली आहे. त्यावरून शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेला पुन्हा लक्ष्य केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की "कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेत सहभागी झाला आहात. याकूबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला, त्यांना तुम्ही मुंबईचे पालकमंत्री बनविले आहे.' 

"मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी टायगर मेमनचे बेकायदेशीर घर तुम्ही तोडले नाही; पण कंगना रनौटचे घर मात्र तोडले. आता तर देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. त्याचा निषेध करतो. आता पुढे काय...? दाऊदला मुंबई पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी का?' असा बोचरा सवाल शेलार यांनी शिवसेनेला केला आहे. 

दरम्यान, निवृत्त नौदल अधिकारी शर्मा यांना मारहाणप्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन शाखाप्रमुखांचा समावेश आहे. या मारहाणीत शर्मा यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. अभिनेत्री कंगना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनीही या मारहाणीचा व्हिडीओ ट्‌विट करत निषेध केला आहे. व्यंग्यचित्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी आपल्या वडिलांना अनेक फोन येत होते. ते इमारतीबाहेर गेल्यानंतर त्यांना काहींनी मारहाण केली, असे शर्मा यांची कन्या डॉ. शीला शर्मा यांनी सांगितले. 

मारहाण प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शाखाप्रमुख कमलेश कदम यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सहा जणांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

संजय शांताराम मांजरे (वय 52), राकेश राजाराम बेळणेकर (वय 31), प्रताप मोतीरामजी सुंदवेरा (वय 45), सुनील विष्णू देसाई (वय 42), राकेश कृष्णा मुळीक (वय 35) अशी अटक करण्यात आलेल्या अन्य जणांनी नावे आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख