जलयुक्त शिवारच्या चौकशीतून ठाकरे सरकार स्वतःच तोंडावर पडेल! - आशिष शेलार - Ashish Shelar Criticizes Maharashtra Government | Politics Marathi News - Sarkarnama

जलयुक्त शिवारच्या चौकशीतून ठाकरे सरकार स्वतःच तोंडावर पडेल! - आशिष शेलार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

लयुक्त शिवारची चौकशी म्हणजे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या श्रमाचीच चौकशी करणार काय?, असा सवाल भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. जलयुक्त शिवारच्या चौकशीतून ठाकरे सरकार स्वतःच तोंडावर पडेल, असा दावाही त्यांनी केला आहे

मुंबई : जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या श्रमाचीच चौकशी करणार काय?, असा सवाल भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. जलयुक्त शिवारच्या चौकशीतून ठाकरे सरकार स्वतःच तोंडावर पडेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच देवेंद्र फडणवीस यांची राज्यात केलेल्या पाणीप्रश्‍नाबाबत तोंड भरून कौतुक केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातील ठाकरे सरकारने जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. जलयुक्त शिवार हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट होता. या योजनेतून प्रत्येक शिवारात पाणी खेळेल असे स्वप्न राज्यातील शेतकऱ्यांनी पाहिले होते. तत्कालीन सरकारनेही हा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला होता आणि त्यासाठी गाजावाजा करीत मोठा खर्चही केला होता. मात्र जलशिवारबाबत कॅगने ताशेरे ओढले होते. त्यानंतर अर्थात थेट बोट दाखविले गेले ते फडणविसांकडे. 

जलयुक्त शिवार योजनेसाठी हजार कोटी खर्च झाला, मात्र त्याचा फायदा झाला नाही. ही योजना राबवूनही राज्यात टॅंकरची संख्या वाढली, भूजल पातळी मात्र वाढली नाही, असे आक्षेप घेण्यात आले आहेत. या योजनेची चौकशी करण्याच्या मागणीवर आता भाजपचे नेते टीका करत आहेत. जलयुक्त शिवार हे शेतकऱ्यांचे जनआंदोलन होते. लोकांच्या भागीदारीतून ही योजना गावोगावी पोहोचली. यात शेतकरी, मजूर यांनी अपार कष्ट केले. या श्रमीकांची चौकशी सरकार करणार आहे काय, असा सवाल आता शेलार यांनी विचारला आहे. 

दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेमध्ये ६ लाख ३३ हजार काम झाली त्यावर 9 हजार 700 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र तत्कालिन सरकारने शुद्ध पद्धतीने काम केली नाहीत. याबाबत 700 तक्रारी आल्या आहेत अशी माहिती मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख