अर्णब गोस्वामी भाजपचा लाऊडस्पीकर : संजय राऊत यांची टीका - Arnab Goswami is BJP Spokesperson Alleges Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामी भाजपचा लाऊडस्पीकर : संजय राऊत यांची टीका

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या २०१८ मध्ये झालेल्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह दोन जणांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यावरुन काल दिवसभर भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली

मुंबई : अर्णब गोस्वामी तो भाजप कार्यकर्ता आहे. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे तसे तो भाजपचा लाऊडस्पीकर आहे. म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी अन्वय नाईक प्रकरणात  कुटुंबाची भेट घेतली पाहिजे, त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. 

अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या २०१८ मध्ये झालेल्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह दोन जणांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यावरुन काल दिवसभर भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, अर्णब गोस्वामी भाजपचा तो स्पोक पर्सन आहे. म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर तो त्यांनी करावा. अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीचं म्हणणं ऐकून भाजपच्या हृदयाला पाझर  फुटला नसेल तर त्यांनी मानवता, न्याय, सत्य या शब्दाचा वापर यापुढे कधीही करू नये,''

"आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे पण त्यांनी नाईक कुटुंबियांच्या घरी जाऊन समजून घेतले असते.  ज्याला मन आहे  त्यांनी रस्त्यावर उतरण्याचे काम केले नसते. ही महाराष्ट्राची परंपरा नाही इतकेच सांगतो. भाजपची रिया चक्रवर्ती प्रकरणात वेगळी भूमिका असते आणि अन्वय नाईक आणि त्यांची आई आत्महत्या प्रकरणात वेगळी? महाराष्ट्राचे पोलीस म्हणजे कळसूत्री बाहुल्या नाहीत. त्यांनी कारवाई केली याचा राजकारणाशी संबंध नाही,''असाही दावा राऊत यांनी केला. 

ते पुढे म्हणाले, "अर्णब गोस्वामी तो भाजप कार्यकर्ता. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे तसे तो भाजपचा लाऊडस्पीकर आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्या प्रकारचा गुन्हा केलाय हे समजायला हवं. त्याच्यावर केलेली कारवाई ही पत्रकार म्हणून नाही. त्याने कोणाला तरी हक्काचे पैसे दिले नाहीत त्यामुळे ते कुटुंब उद्धवस्त झाले. त्यातून त्यांनी आत्महत्या केलीआणि कोणामुळे आत्महत्या केली ते लिहून ठेवले, जे सुशांत सिंग प्रकरणात नव्हते,''

''सुशांत प्रकरणात वेगळी आणि या प्रकरणात वेगळी अशी केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपची भूमिका आहे. पडद्यामागून दिल्लीतून काय काय हालचाली सुरू आहेत हे जर मी सांगितले तर सगळ्यांची पळताभुई थोडी होईल. देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी अन्वय नाईक प्रकरणात कुटुंबाची भेट घेतली पाहिजे, त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. त्यांचे अश्रू आणि वेदना समजली पाहिजे. विरोधक  जो हंगामा करत आहेत, त्यामुळे त्यांचे वस्त्र हरण होत आहे,'' असेही राऊत म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख