पालकमंत्र्यांसोबत पदाधिकाऱ्यांचे गुफ्तगु; बंद सभागृहात कानमंत्र - Anil Parab Talked Secretly with Selective Shivsena Office bearers | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्र्यांसोबत पदाधिकाऱ्यांचे गुफ्तगु; बंद सभागृहात कानमंत्र

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

बैठक सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांना सभागृहातून बाहेर काढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत होती. सेनेच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांचा विश्‍वास नाही का, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

चिपळूण : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला भाजपसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी कडवे आव्हान उभे केले आहे. या पार्श्‍वभूमीवर मोजक्‍या पदाधिकाऱ्यांची वालोपे येथे बैठक घेवून पालकमंत्री अनिल परब यांनी, त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी कानमंत्र दिला.

मात्र, बैठक सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांना सभागृहातून बाहेर काढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत होती. सेनेच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांचा विश्‍वास नाही का, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

पालकमंत्री परब यांचा चिपळूण दौरा शासकीय कार्यालयातून जाहीर करण्यात आला. दीर्घ कालावधीनंतर पालकमंत्र्यांचे दर्शन होणार, म्हणून कार्यकर्ते आनंदी झाले होते. वालोपे (ता. चिपळूण) येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा दुपारी साडेतीन नंतर राखीव वेळ होता. आमदार भास्कर जाधव, योगेश कदम यांच्यासह जिल्हाप्रमुख सचिन कदम, अण्णा कदम, शशिकांत चव्हाण व चिपळूणसह खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्‍यातील शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी हॉटेलवर पोहचले. पेढे - परशुराम गावातील ग्रामस्थ मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील भूसंपादनाचा विषय घेवून पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. बैठकीचा तपशील सभागृहाच्या बाहेर जाता कामा नये, याची पुरेपूर काळजी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली.

पालकमंत्री काहीतरी उपायोजना करतील..
ग्रामपंचायतीची निवडणूक असलेल्या काही गावांमध्ये शिवसेनेतच अंतर्गत बंडखोरी आहे. पालकमंत्री त्यावर काहीतरी उपायोजना करतील, या अपेक्षेने काहीजण आले होते. मतदानासाठी २ दिवस उरले आहेत. पालकमंत्री जो कानमंत्र देतील, तो सभागृहाच्या बाहेर जाता कामा नये, यासाठी बैठकीच्या सुरवातीलाच कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे पंचाययत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची गोपनीय बैठक पालकमंत्र्यांबरोबर झाली.

मी पेढे - परशुराम मधील ग्रामस्थांना घेवून पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. बैठक संपल्याचे लक्षात आल्यानंतर जबरदस्तीने सभागृहात प्रवेश केला. पालकमंत्र्यांना पेढे - परशुराम गावातील ग्रामस्थांचा प्रश्‍न समजून सांगितला. ते म्हणाले, मला आता खूप उशिर झाला आहे. २७ जानेवारीला सर्व संबंधितांची रत्नागिरीला बैठक घेवून तुमच्या विषयावर विस्तृतपणे चर्चा करू. आमचा पालकमंत्र्यांवर पूर्ण विश्‍वास आहे. त्यांना भेटता आले, हीच समाधानाची बाब आहे.-विश्‍वास सुर्वे, माजी जिल्हा परिषद, सदस्य पेढे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख