शवसेना म्हणत अमृता फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले  - Amrita Fadnavis criticizes Shiv Sena over Bihar election results | Politics Marathi News - Sarkarnama

शवसेना म्हणत अमृता फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

काय चाल्लंय तरी काय शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहारमध्ये.

पुणे : बिहार विधानसभा निवडणुकीत "एनडीए'ने पुन्हा एकदा विजय मिळविला. विशेषतः भारतीय जनता पक्षाने प्रथमच बिहारमध्ये "जदयू'पेक्षा जागा मिळविल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे सर्व जागांवर डिपॉझिट जप्त झाले आहे, तर 23 ठिकाणी नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे. अमृता यांनी या पूर्वी अनेकदा शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. 

शिवसेनेने बिहारमध्ये पन्नास जागा लढवल्या असून त्यांचा सर्व ठिकाणी पराभव झाला आहे. अनेक उमेदवारांना आपले डिपॉझिटही राखता आलेले नाही. काही ठिकाणी तर नोटापेक्षाही शिवसेनेला कमी मते मिळाली आहेत. त्यांच्या या कामगिरीवरून अमृता फडणवीस यांनी ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

ट्विटमध्ये अमृता यांनी म्हटले आहे की, "का हय ये, "शवसैना' ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहारमें. काय चाल्लंय तरी काय शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहारमध्ये. महाराष्ट्र कुठे ही नेला असो; पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद.' 

अमृता फडणवीस यांनी ट्‌विटसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओही अपलोड केला आहे. त्यात फडणवीस यांनी बिहार निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला आहे. त्यात शिवसेनेने लढवलेल्या सर्व 50 जागांवरील त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तसेच, 23 जागांवर तर त्यांना नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत.

शिवसेनेचे नेते सगळ्या जगाला सल्ले देत फिरतात. "खाली पडले तर आपलेच बोट वर आहे, असे शिवसेना सांगत फिरते, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे प्रचाराला जाणार आणि बिहारमधील निवडणूक पलटवणार असे चित्र त्यांनी उभे केले होते. पण, नीच्चांकी मतसंख्येचे रेकॉर्ड शिवसेनेच्या नावावर या निवडणुकीत झाले आहे, असे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक ते दोन आमदार त्या ठिकाणी यापूर्वी निवडून यायचे. मात्र, या वेळी त्यांनाही भोपळा फोडता आलेला नाही. बिहार निवडणुकीतील अपयशावर बोट ठेवत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी यापूर्वी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू आणि कंगना राणावत यांच्या प्रकरणानंतरही सेनेवर टीका केली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख