शिवसेनेच्या रुग्णवाहिकेने अमिताभ बच्चनचे वाचवले होते प्राण!

ही सेवा २६ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.
Amitabh Bachchan's life was saved due to Shiv Sena's ambulance
Amitabh Bachchan's life was saved due to Shiv Sena's ambulance

ठाणे : रुग्णवाहिका (अँब्युलन्स) ही शिवसेनेची ओळख आहे. त्याबाबतच्या कथा ज्यांनी ज्यांनी सांगितल्या, त्या जर मी सांगत बसलो तर तास ते दीडतास सुद्धा कमी पडेल. स्वतः अमिताभ बच्चन यांचेही प्राण शिवसेनेच्या रुग्णवाहिकेमुळे कसे वाचले, हे त्यांनी अनेकदा सांगितले आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या जनतेसाठी अँब्युलन्स उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. (Amitabh Bachchan's life was saved due to Shiv Sena's ambulance)

प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. त्याचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.

दरम्यान, प्रताप सरनाईक फाउंडेशन माध्यमातून सर्व वैद्यकिय उपकरणांसहित सुसज्ज दोन कार्डियाक अँब्युलन्स, दोन ब्लड डोनेशन व्हॅन, कर्करोगाचे निदान जागेवर तात्काळ होण्याकरीता एक कर्करोग निदान व्हॅन व शीतपेटीसह दोन मोक्षरथ अशा सर्व वैद्यकिय सुविधा ठाण्याच्या नागरिकांसाठी २४ तास मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही सेवा २६ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. त्याची माहिती आमदार सरनाईक यांनी कार्यक्रमात दिली होती. त्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दहीहंडी उत्सव आणि उत्साहाला कोरोनामुळे मुकलो आहोत. दहीहंडीचे थरार, उधाण काय असतो, ते मी ठाण्यात येऊन अनुभवलेले आहे. अनेक जण तारीख पे तारीख देतात. पण करत तर काहीच नाहीत. पण तुम्ही घेतलेल्या तारखेवर जनतेच्या उपयोगाचा प्राणवायूचा प्रकल्प सुरू केला आहे. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिवसेनेचे ब्रीद आहे. पण काही जण कोरोनाचा धोका व्यक्त होऊनही यात्रा काढत आहेत. जनतेच्या उपायोगाची कामे करतात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. 

ठाणे महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचाराला मी बाळासाहेबांसोबत आलो होतो. त्यावेळी बैलगाडीतून प्रचार केला जायचा. तेव्हापासून मी ठाण्यात येत आहे. काहीजण कोरोनाचे निमय तोडून आम्ही करून दाखवलं असे सांगत आहे. पण, तुम्हाला आंदोलन करायचे आहे, तर कोरोनाविरोधात आंदोलन करा. रुग्णवाहिका द्या, ऑक्सिजन प्लांट उभारा. पण, ते करण्याची तुमची हिम्मत आणि कुवती नाही. तेवढी प्रगल्भताही तुमच्याकडे नाही. आम्हाला फक्त रस्त्यावर गोंधळ घालायचा आहे आणि जे शिस्त पाळणारे नागरिक आहेत, त्यांचाही जीव कारण नसताना धोक्यात घालण्याचे काम काहीजण बेजाबदारपणे करत आहेत.  

ठाण्यात पंधरा ऑगस्टनंतर कोरोनाची संख्या वाढत आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. नाइलास्ताव काही निर्णय घ्यावे लागतील. टास्क फोर्सने जे सांगितले आहे, त्याचे पालन आपण केले पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी या वेळी आवाहन केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com