Ajitdada says, "Those who believe in Ramdev Baba's medicine should take it! '' | Sarkarnama

अजितदादा म्हणतात, "" रामदेवबाबांच्या औषधावर ज्यांचा विश्वास त्यांनी ते घ्यावे ! '' 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 जून 2020

जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने बघते, त्यांच्या विरोधात कारवाई करायलाच हवी. नागरिकांनीही चिनी वस्तूंचा वापर करु नये,

मुंबई : देशातील सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, मग चीन जागेवरच येईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

भारत आणि चीनमधील तणावानंतर राज्यसरकारने चीनसोबतच्या आपल्या गुंतवणूक प्रकल्पांना स्थगिती दिली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने बघते, त्यांच्या विरोधात कारवाई करायलाच हवी. नागरिकांनीही चिनी वस्तूंचा वापर करु नये, जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहते, आपल्याविरोधात कुरबुरी काढत आहे अशा राष्ट्रांच्या विरोधात कडक भूमिका घेतली पाहिजे.

उलट आपल्या नागरिकांनी चीनमध्ये तयार झालेली एकही वस्तू वापरु नये. आपल्या देशातील सव्वाशे कोटी जनतेने जर असे केले तर चीन जागेवरच येईल. 

11 लाख शेतकरी पीक कर्जमाफीमध्ये बसत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे अडचणी आल्या आहेत. शेतकऱ्यांना 8 हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी बॅंकांना हमी दिली आहे, अशी माहीती पवार यांनी दिली.

कोरोना संदर्भात ते म्हणाले की, आपण टेस्टिंग वाढविल्या असल्याने रोज बाधित असणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. अत्यावश्‍यक सेवा व्यतिरिक्त इतरांना देखील रेल्वे सुरु करा, अशी मागणी आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. 

यावेळी अजित पवार यांनी कोकणाच्या मदतकार्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, कोकणाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली असता दुर्गम भागातील वाड्या आणि काही ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या शिवाय अशा ठिकाणी मोफत रॉकेल देण्याबाबत निर्णय झाला आहे. 

अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याविषयी देखील स्पष्टपणे भूमिका मांडली. ते म्हणाले, जोपर्यंत राज्य सरकारला खात्री होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करुन राज्यातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालणार नाही. 

अजित पवार यांनी रामदेव बाबा यांच्या कोरोनावरील आयुर्वेदिक औषधावरही मत व्यक्त केले. ते म्हणाले, बाजारात अनेकजण कोरोनावर औषध आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रामदेव बाबांनी कोरोनावर औषध आणले आहे. परंतु ज्यांचा त्यांच्या औषधांवर विश्वास आहे त्यांनी ते खुशाल घ्यावे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख