बंगालच्या निवडणुका संपताच देशात लॉकडाऊन लागेल - After the Bengal elections, there will be a lockdown in the country : Arvind Sawant | Politics Marathi News - Sarkarnama

बंगालच्या निवडणुका संपताच देशात लॉकडाऊन लागेल

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

राज्यात सत्तांतरासाठी हे सगळं त्यांच्याकडून सुरू आहे.

मुंबई  ः  सध्या बंगाल विधानसभेच्या निवडणुका संपायच्या आहेत, त्यामुळं लॉकडाऊन हा पर्याय नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत. पण, निवडणूक झाल्यावर लॉकडाऊन लागेल, असे भाष्य शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधानाच्या कालच्या आवाहनावर केले. .

मुंबईत पत्रकारांशी बोलताना अरविंद सावंत यांनी वरील भाष्य केले. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर ऑक्सिजन टंचाईसह विविध मुद्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, देशात कोरोनाचे संकट असताना केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाकडून राजकारण केले जात आहे. पण, हे राजकारण गरिबांच्या जीवावर येणारे आहे. कारण महाराष्ट्रातून ऑक्सिजन आणायला गेलेल्या रेल्वेला फिरवलं जात आहे. ‘ग्रीन कॉरिडोर करून ऑक्सिजन एक्स्प्रेस आणली जाईल, असे रेल्वेने सांगितले होते. पण, तसं होताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.

कळंबोलीहून ऑक्सिजन एक्सप्रेस ही १९ तारखेला निघाली खरी. पण, मंगळवारी रात्री २४ तासानंतरही ती अकोला स्टेशनवरच होती. आता रायपूरजवळ आहे. म्हणजे गाडीला जायचंय विशाखापट्टणमला आहे व फिरतेय कुठे माहिती नाही. यामुळे ऑक्सीजन येण्यास अजून तीन दिवस लागतील, असेही सावंत यांनी सांगितले.

ग्रीन कॉरिडोर करून ती ऑक्सीजन एक्स्प्रेस आणली जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. पण, तसं होताना दिसत नाही. ही केंद्र सरकारची क्रूर आणि कपट नीती सुरू आहे. या प्रकरणी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही खासदार सावंत यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने चांगले काम केलेले दिसू नये, याचसाठी हे घाणरडे राजकारण सुरू आहे. प्राण कंठाशी आले तरी प्राणवायू रेल्वेमार्फत येईल की माहिती नाही. कारण, कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस २४ तासानंतरही अकोला स्टेशनवरच होती. त्यामुळे ऑक्सीजन येण्यास अजून तीन दिवस लागतील. असा दावाही सावंत यांनी यावेळी बोलताना केला. 

भिलाई प्लांटमधून सर्व ऑक्सीजन राज्याला द्यायचे ठरले होते, आता ते म्हणतात की या प्रकल्पात केवळ ४० टक्केच ऑक्सीजन महाराष्ट्राला देणार असे तेथील अधिकारी सांगत आहेत. इथंही राजकारण सुरू आहे. केंद्र सरकारने दिलेले व्हेंटीलेटर खराब निघाले आहेत, अशा प्रकारे केंद्रातील सरकारकडून राज्यासोबत दुजाभाव सुरू आहे, असा आरोप सावंत यांनी पुन्हा एकदा केला.

राज्यात सत्तांतरासाठी हे सगळं त्यांच्याकडून सुरू आहे. कारण, कुडमुडे ज्योतिषी तारखांवर तारखा सांगत आहेत, असेही शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते सावंत यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख