राज्यपालपदी योग्य व्यक्ती बसली नाही : यशोमती ठाकूरांचा कोश्‍यारींवर निशाणा - Adv. Yashomati Thakur's criticism of Governor Bhagat Singh Koshyari | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपालपदी योग्य व्यक्ती बसली नाही : यशोमती ठाकूरांचा कोश्‍यारींवर निशाणा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

राज्यपाल  हे मुख्यमंत्री यांना राज्यातील कृषी महाविद्यालयाच्या मंजुरीवरून उलट प्रश्न विचारतात.

जत : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्यातील सख्य संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीत. आताही महिला आणि बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल कोश्‍यारी यांना पुन्हा लक्ष्य करत राज्यपाल पदासाख्या घटनात्मक पदावर योग्य व्यक्ती बसली नाही, अशा शब्दांत टीका केली आहे. 

सांगली जिल्ह्यातील जत येथे "माळरान कृषी, पशुप्रदर्शन व कृषी सन्मान' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्री ऍड. ठाकूर होत्या. त्यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्‍यारी यांच्यावर निशाणा साधला. 

"राज्यपाल कोश्‍यारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कृषी महाविद्यालयाच्या मंजुरीवरून उलट प्रश्न विचारतात. देशाच्या घटनात्मक पदाचा आम्ही आदर करतो. मात्र, राज्यात घटनात्मक असलेल्या राज्यपाल पदावर योग्य माणूस बसला नाही, त्यामुळेच जतला कृषी महाविद्यालय होत नाही, असे खळबळजनक वक्तव्य मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले. 

राज्यपाल कोश्‍यारी हे कामांना आडकाठी आणण्याचे काम करतात, असा आरोप ठाकूर यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या वर्षभरापासून कुरबुरी सुरू आहेत. मंदिरे उघडण्याच्या प्रश्‍नावरून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे भाषेत उत्तर दिले होते. विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यावरूनही दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली होती. 

नाशिक येथे दोन दिवसांपूर्वी बोलताना राज्यपालांनी धावपट्टू कविता राऊत हिच्या नोकरीच्या प्रश्‍नावरूनही सरकारला चिमटे घेतले होते. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यापालांवर निशाणा साधला आहे, त्यामुळे सरकार आणि राज्यपाल वादाचा सिलसिला कायम आहे. 

विधान परिषदेच्या 12 जागा भरण्याबाबत राज्यपाल अद्यापपर्यंत निर्णय घेत नाही, त्यावर अजित पवार म्हणाले की, राज्यपालांनी आता अंत पाहू नये. मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी प्रस्ताव दिलेला आहे. याबाबत आता राज्यपालांची वेळ घेऊन चर्चा करणार आहोत. आमचं 171 आमदारांचे बहुमत सिद्ध झालेले आहे, त्यामुळे राज्यपालांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख