राजकीयदृष्ट्या त्रासदायक ठरणाऱ्या माणसाचा काटा काढण्यासाठी ईडीचा वापर   - Action against Jarandeshwar Sugar Factory is politically motivated : Raju Shetty | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

राजकीयदृष्ट्या त्रासदायक ठरणाऱ्या माणसाचा काटा काढण्यासाठी ईडीचा वापर  

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

त्यावेळी ईडी झोपली होती काय?

मुंबई : जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई ही निश्चितपणे राजकीय दृष्टीने प्रेरीत आहे. ईडी ही राजकीयदृष्टया कारवाई करत आहे. मी ईडीच्या दारात अनेक खेटे घातले आहेत. त्यांना पुराव्यानिशी सर्व कागदपत्रे दिली आहेत. ज्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई होत आहे, ते मी पाच वर्षांपूर्वी दिले आहेत. त्यावेळी ईडी झोपली होती काय? त्यावेळी ईडीने कारवाई का केली नाही. याचा अर्थ ईडीला कोणीतरी सांगतंय की, आमुक आमुक एक माणूस मला त्रासदायक ठरतोय आणि त्याचा काटा काढायचा आहे; म्हणून जर कारवाई होत असेल तर यंत्रणेवरील सर्वसामान्यांचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. (Action against Jarandeshwar Sugar Factory is politically motivated : Raju Shetty)

जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर शेट्टी हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील आरोप केला. यावेळी त्यांनी एका नव्हे राज्यातील ४३ साखर कारखान्याची चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणीही केली.  ते म्हणाले, ईडी, प्राप्तीकर विभाग आणि सीबीआय ह्या संस्था केंद्र सरकारच्या हातातील हत्यारं झाली आहेत. त्याचा उपयोग राजकीयदृष्ट्य ब्लॅकमेल करण्यासाठी सातत्याने झाला आहे. त्यातीलच जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई हा प्रकार आहे.

हेही वाचा : गेल्या वर्षी हुकलेली संधी अशोक पवार यंदा आबाराजे मांढरेंना देणार काय? 

महाराष्ट्रातील एकूण ४३ साखर कारखाने कवडीमोल किमतीने विकले गेले. त्याला जबाबदार असणाऱ्या ८९ व्यक्तींच्या विरोधात मी पाच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात तक्रार केली आहे. परंतु त्याची चौकशी झाली नाही किंवा ती केस कधीच बोर्डावर आली नाही. उच्च न्यायालयाकडून मला एवढंच सांगण्यात आलं की तुम्ही पहिले एफआरआय दाखल करा; मगच आमच्याकडे या. त्यावेळी पोलिसांनी एफआरआय दाखल करून घेण्यास नकार दिला हेाता.

मी ईडी, सेबी, प्राप्तीकर विभाग यांच्याकडे हेलपाटे घातले. हे कारखाने विकत घेण्यासाठी यांच्याकडे पैसे कोठून आले याची चौकशी करा, अशी मागणी केली. त्यावेळी कुठल्याही यंत्रणेने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर हळूहळू, टप्पाटप्याने एका एका व्यक्तीला पकडून त्याला राजकीदृष्टया ब्लॅकमेल करण्यासाठी याचा उपयोग केला जात आहे, असा आरोपही शेट्टी यांनी या वेळी केला.

ब्लॅकमेलासाठी होणाऱ्या कारवाईवर आक्षेप

विक्री झालेल्या ४३ साखर कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे, या मताशी मी आजही ठाम आहे. या चौकशीतून कोण गोत्यात येतं आणि कोण जेलमध्ये जातं, याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. हे ४३ साखर कारखाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आहेत. पण, केवळ राजकीयदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्या व्यक्तीला आपल्या पक्षात घ्यायचे आणि ती चौकशी बंद करायची, असे धंदे होणार असतील तर मला त्यावर आक्षेप आहे, असा आक्षेपही शेट्टी यांनी या वेळी घेतला.

सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कारखाने विकत घेतले

शेट्टी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सर्वच मोठ्या राजकीय पक्षातील लोकांनी साखर कारखाने विकत घेतले आहेत. त्यांची सर्वांची चौकशी झालीच पाहिजे. जरंडेश्वार कारखान्यावरील कारवाईत अजित पवारांचे नाव येत आहे, याबाबत शेट्टी म्हणाले की नावच घ्यायचे असेल तर सर्वांचीच घेता येतील. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही नावे घेता येतील. मी यादी देतो. हे ४३ साखर कारखाने कुणाच्या ताब्यात आहेत आणि हे कारखाने सध्या उत्तमरित्या चालू आहेत, यामागील गौडबंगाल काय आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे, असं माझे स्पष्ट मत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख