मुंबादेवी, सिद्धिविनायक मंदिर सज्ज! ; कोरोनामुळे प्रशासनाचे खास नियोजन - Siddhivinayak Mumbadevi Temples to open tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबादेवी, सिद्धिविनायक मंदिर सज्ज! ; कोरोनामुळे प्रशासनाचे खास नियोजन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

कोरोनामुळे गेले सात महिने बंद असलेले सिद्धिविनायक आणि मुंबादेवीचे मंदिर उद्यापासून (ता. १६) भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज दोन्ही मंदिरांत जय्यत तयारी करण्यात आली. आज सकाळपासूनच मंदिरांमध्ये कोरोनामुळे साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यात आले. भाविकांना दर्शन रांगेत घेता यावे यासाठी मंदिरांबाहेर बेरिकेड्‌स लावण्यात आले आहेत. प्रत्येकी पाच फूट अंतरावर एक फूट व्यासाचे वर्तुळही काढण्यात आले आहे.

मुंबई :  कोरोनामुळे गेले सात महिने बंद असलेले सिद्धिविनायक आणि मुंबादेवीचे मंदिर उद्यापासून (ता. १६) भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज दोन्ही मंदिरांत जय्यत तयारी करण्यात आली. आज सकाळपासूनच मंदिरांमध्ये कोरोनामुळे साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यात आले. भाविकांना दर्शन रांगेत घेता यावे यासाठी मंदिरांबाहेर बेरिकेड्‌स लावण्यात आले आहेत. प्रत्येकी पाच फूट अंतरावर एक फूट व्यासाचे वर्तुळही काढण्यात आले आहे.

मुंबादेवी मंदिर उद्या सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले होईल. मुंबईची ग्रामदेवता असलेली मुंबादेवी आणि शेजारी विराजमान अन्नपूर्णा माता दर्शन सोहळा सुरू होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मंदिरात दर्शनासाठी रांगेत प्रवेश देण्यात येणार आहे. दहा वर्षांच्या आतील मुलांना तसेच ६० वर्षांवरील भाविकांना दर्शन रांगेत प्रवेश देण्यात येणार नाही. प्रत्येक दोन तासांनंतर दहा मिनिटांसाठी मंदिर दर्शनार्थ बंद ठेवण्यात येणार असून, आतमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येईल. दर्शनासाठी येताना भाविकांना फुले, हार, नारळ, ओटी साहित्य आणि प्रसाद नेता येणार नाही. सामाजिक अंतर, तोंडावर मास्क असणे बंधनकारक आहे.

मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. दरम्यान, कुंभारवाडा येथील गोलदेऊळ, शिवमंदिर, गुलालवाडी येथील एकमेव सूर्यमंदिर दर्शनार्थ उघडण्यात येणार आहे. तेथेही नियोजन पूर्ण झाले आहे. सिद्धिविनायक मंदिर सकाळी ७ वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येईल. तासाला केवळ १०० भाविकांनाच मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येईल. दिवसभरात एक हजार भाविकांना दर्शन घेता येईल. मंदिरात येताना भाविकांनी मास्क परिधान करणे तसेच मंदिराच्या आतमध्ये भविकांमध्ये सहा फुटांचे अंतर राखण्यात येईल. मंदिरात येताना कुणीही मौल्यवान वस्तू आणू नये, असे आवाहन सिद्धिविनायक न्यासाने केले आहे.

ऍपमध्ये नोंदणीनंतर प्रवेश
सिद्धिविनायक मंदिर न्यासाने 'सिद्धिविनायक टेम्पल' हे ऍप बनविले आहे. दर्शनासाठी येणाऱ्यांना मोबाईलवर ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. यामध्ये नोंदणी केल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश निश्‍चित करण्यात येणार असल्याचे सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले. मोबाईलवर ऍप डाऊनलोड केल्यानंतर लगेचच स्क्रीनवर क्‍यूआर कोड प्राप्त होईल. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना क्‍यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर थर्मल तपासणी करून मग मंदिरात दर्शनासाठी जाता येईल. ज्यांच्याकडे मोबाईल नसेल त्यांच्यासाठी मंदिर प्रवेशद्वाराजवळ एक स्वतंत्र सेवा सुरू करण्यात येणार आहे. या काऊंटरजवळ भाविकांची नोंदणी केली जाईल.

हाजीअलीत तीनदा नमाज
माहीम दर्ग्याला आयएओ प्रमाणपत्र असल्याने आमचे नियमही आहेतच. सोशल डिस्टन्सिंग तसेच आरोग्यविषयक सरकारी नियम पाळण्यासाठी लोकांना रांगांमधून कसे आत सोडावे, प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग वेगवेगळा असावा, सीसीटीव्हीमार्फत सर्वत्र लक्ष ठेवावे यासंदर्भात समन्वय साधला जाईल. किंबहुना शुक्रवारच्या नमाजासाठीही एकाचवेळी गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जाईल, असे हाजीअली व माहीम दर्ग्याचे विश्‍वस्त सोहेल खांडवानी यांनी सांगितले. भाविकांची श्रद्धा व उत्सुक्तता आम्ही समजू शकतो; मात्र नियम पाळून त्यांनीही सहकार्य करावे. हाजीअली दर्ग्याची स्वच्छता रोज सुरू होतीच. आता दिवसातून तीनदा स्वच्छता होईल. गर्दीचा ताण चार पाच दिवस राहील, मग सर्वकाही सुरळीत होईल. गर्दी फारच वाढली तर आधीच वेळेचे बुकिंग करून प्रवेश द्यायचाही प्रस्ताव आहे. शुक्रवारची नमाजही दोन-तीन वेळा करण्यात येईल, ज्यायोगे एकदम भाविकांची गर्दी होणार नाही, असेही खांडवानी म्हणाले.

मुंबादेवी पावतीची देणगी नाही!
दानपेटी खुली असली तरी उद्याचा दिवस पावतीच्या देणग्या स्वीकारल्या जाणार नाहीत. तेथेही कर्मचारी व भाविक यांचा संपर्क न येण्याची तयारी करून मगच ती सोय केली जाईल. मंदिरात कोठेही भाविक व कर्मचारी यांचा संपर्क येणार नाही याची काळजी घेतली आहे, असे मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी सांगितले.

महालक्ष्मी गाभाऱ्यात प्रवेश नाही
आरोग्यविषयक व सामाजिक अंतराचे सरकारचे सर्व नियम पाळले जातील. मास्क अत्यावश्‍यक असेल. पुजारी-कर्मचारी यांच्याशी भाविकांचा संपर्क येऊ नये म्हणून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही, गाभाऱ्याच्या दारातूनच दर्शन घेता येईल, असे महालक्ष्मी मंदिराचे महाव्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये म्हणाले.

गेले सात महिने आमची मोठी गैरसोय झाली. आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे खुली होत आहेत. त्यामुळे आमचा रोजगारही वाढेल. मालाचा खप होईल. कुटुंबाला उत्पन्न मिळेल.
- अतिकुमार भारती, लक्ष्मी मिश्रा, दुकानदार

मुंबादेवीचे मंदिर दर्शनासाठी खुले होते, ही फार आनंदाची बातमी आहे. आम्ही दर्शनाला येऊ. सात महिने दर्शन मिळाले नाही.
- सुरेखा शेडगे, सूर्यकांत शेडगे, भाविक

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख