मुंबई : सर्वसामान्यांना लवकरच रेल्वे प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या प्रवासासोबत प्रवाशांना आपली कोविड चाचणीची सुविधा देखील मिळण्याची शक्यता आहे. रेल्वेस्थानकांवरील वन रूपी क्लिनिक लवकरच सुरू होणार असून, या क्लिनिकच्या माध्यमातून रेल्वेस्थानकांवर कोविड चाचण्या करण्याची परवानगी मागण्यात आली आहे.
सर्वसामान्य लोकांना रेल्वे प्रवासाची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे. यावर रेल्वे प्रशासनाचा हिरवा कंदील मिळताच सर्वांनाच रेल्वे प्रवास करता येणार आहे. येत्या आठवड्याभरात ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानकांवर वन रूपी क्लिनिक सुरू करण्याची परवनगी रेल्वेने दिली आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून गरजूंच्या कोरोना निदानासाठी आवश्यक असणारी अँटीजेन चाचणी करण्याची परवानगी वन रूपी क्लिनिकने रेल्वे प्रशासनाकडे मागितली आहे.
ही परवानगी मिळताच रेल्वे प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. कोविडचे संकट लक्षात घेऊन वन रूपी क्लिनिकमध्ये एक्सरे यंत्र, सिटी स्कॅन सुविधा, पल्समीटर, ऑक्सिमीटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय सुसज्ज रुग्णवाहिका देखील तयार असणार आहे. यामुळे एखाद्या रुग्णाला प्रवासादरम्यान काही समस्या जाणवल्यास त्याची तत्काळ तपासणी करता येणार असल्याचे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.
१७ स्थानकांवर सुविधा मिळणार
सध्या मध्य रेल्वेवरील कल्याण, तसेच डोंबिवली रेल्वेस्थानकात वन रूपी क्लिनिकमध्ये अँटीजेन चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील प्रवाशांना आपल्या प्रवासात अँटीजेन चाचणी करून कोविडचे निदान करता येते आहे. अशीच परवानगी मुंबईत देखील मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यास मुंबईतील १७ रेल्वेस्थानकात ही सुविधा देता येणार आहे.
रेल्वे प्रवासात अनेकांना या चाचणीची गरज भासू शकते. इतकेच नाही तर एखाद्याला अशक्तपणा जाणवला किंवा त्याची ऑक्सिजनची पातळी कमी झाली तरी अशा रुग्णांवर क्लिनिकमध्ये उपचार करताना त्यांची अँटीजेन चाचणी देखील करता येणार आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाचे कोविडबाबतचे निदान तत्काळ करता येणार आहे. त्यामुळे ही परवानगी मागितली आहे - डॉ. राहुल घुले, प्रमुख, वनरूपी क्लिनिक.
Edited By - Amit Golwalkar

