Maharashtra CM Uddhav Thackeray
Maharashtra CM Uddhav Thackeray

रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला २० दिवसांत परवानगी : उद्धव ठाकरे

सरकार सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यावर ठाकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे आश्‍वासन दिले. येथील शासकीय रुग्णालयातील ऑनलाईन प्लाझ्मा थेरेपी सुविधा केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरीकरांना दसऱ्याची भेट म्हणून वैद्यकीय महाविद्यालय देण्याचे जाहीर केले

रत्नागिरी :  रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सरकार सकारात्मक आहे. रायगड आणि सिंधुदुर्गात दिले, तसे ते रत्नागिरीतही देऊ. त्यासाठी आवश्‍यक सर्व अटींची पूर्तता करा. २० दिवसांत परवानगी देतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

सरकार सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यावर ठाकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे आश्‍वासन दिले. येथील शासकीय रुग्णालयातील ऑनलाईन प्लाझ्मा थेरेपी सुविधा केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरीकरांना दसऱ्याची भेट म्हणून वैद्यकीय महाविद्यालय देण्याचे जाहीर केले. ते म्हणाले, ''माझ्याकडे कौतुकाचे, अभिनंदनाचे शब्द कानावर येतात. त्यामागे आपण केलेली मागणी असते, हे माझ्या लक्षात आहे. त्यानुसारच वैद्यकीय महाविद्यालयासाठी आम्ही सकारात्मक आहोत,''

तत्पूर्वी, आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ''ठाकरे कुटुंबाचा कोकणावर फार जीव आहे, त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाला तत्काळ मान्यता मिळेल. रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी, तर सिंधुदुर्गात खासदार विनायक राऊत यांनी शासन निर्णयासाठी आग्रही राहून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता मिळवली. त्याप्रमाणे येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळू शकते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी रत्नागिरीत २० एकर जागा शोधून ठेवा. सगळी पूर्वतयारी करा. मी शासन निर्णय काढायला तयार आहे. 'आयसीएमआर'च्या निर्देशाप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाला मायक्रोबायोलॉजी लॅब लागते. ती शासकीय रुग्णालयात नाही. त्यासाठी काम करून घ्यावे,''

वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, ''वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याचा शासन निर्णय महिनाभरात काढता येऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी तर २० दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मान्यतेसाठी ३०० बेडस्‌ आवश्‍यक असतात. त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात ३०० बेडस्‌, मनोरुग्णालयात १००, तर महिला रुग्णालयात २५० बेडस्‌ उपलब्ध आहेत. त्यामुळे याला मान्यता देण्यात अडचण येणार नाही. महाविद्यालयासाठी लागणारी इमारत कोठे बांधायची, याबाबत निर्णय नंतर घेता येऊ शकतो. सिंधुदुर्गचे महाविद्यालय हे बृहत्‌ आराखड्यात होते. रत्नागिरीतील महाविद्यालयासाठी राज्याकडून आवश्‍यक निधीची तरतूद करता येऊ शकते,''

आघाडी सरकार शब्द पाळते
महाविकास आघाडी सरकार दिलेला शब्द पाळते, हे रत्नागिरीत सुरू केलेल्या राज्यातील पहिल्या प्लाझ्मा सेंटरच्या निमित्ताने आम्ही दाखवून दिले आहे. दुसरे केंद्र सिंधुदुर्गमध्ये सुरू केले जाईल, असा विश्‍वास मंत्री सामंत यांनी व्यक्‍त केला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com