मध्य रेल्वेने लाॅकडाऊनमध्ये अनेकांना पोहोचवली घरपोच औषधे - Central Railway Supplied Medicines to Patients through Parcel Service | Politics Marathi News - Sarkarnama

मध्य रेल्वेने लाॅकडाऊनमध्ये अनेकांना पोहोचवली घरपोच औषधे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 जुलै 2020

मध्य रेल्वेने कोरोनासारख्या महामारीच्या संकटकाळात जलद गतीने औषधे पोहोचवत भारतभरात ८ हून अधिक कर्करोग रुग्णांना दिलासा दिला आहे. काही वेळेस थेट रेल्वेसेवा नसताना विविध टप्प्याने देखील रेल्वेने औषधाचा पुरवठा केला आहे.

मुंबई  : लॉकडाऊन काळात वाहतुकीच्या सुविधा बंद असल्याने आजारी रूग्णांसाठी घरपोच औषधे पुरवण्याचा उपक्रम मध्य रेल्वेने हाती घेतला आहे. कर्करोगासारख्या दुर्घर आजाराशी लढा देणाऱ्यांना नियमीत औषधे आवश्‍यक असतात. पण  लॉकडाऊन असल्याने महागड्या आणि केवळ मुंबईसारख्या ठिकाणीच मिळणाऱ्या औषधांची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी ट्वीटरवरुन रेल्वेला केली. त्यानुसार मध्य रेल्वे मालवाहतूकीच्या सहाय्याने अशा ८ रुग्णांना आतापर्यंत औषधांचा पुरवठा घरपोच केला.

मध्य रेल्वेने कोरोनासारख्या महामारीच्या संकटकाळात जलद गतीने औषधे पोहोचवत भारतभरात ८ हून अधिक कर्करोग रुग्णांना दिलासा दिला आहे. काही वेळेस थेट रेल्वेसेवा नसताना विविध टप्प्याने देखील रेल्वेने औषधाचा पुरवठा केला आहे. त्याअन्वये पार्सल बुकिंग करुन दोन रूग्णांकरिता कर्करोगाची औषधे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन ते पुणे येथे विशेष पार्सल ट्रेनने तर पुण्याहून साता-याला कामगारांसाठी असलेल्या विशेष गाडीने गार्डच्या डब्यातून नेण्यात आली होती. 

तिस-या टप्प्यात श्रमिक विशेष गाडीच्या गार्डच्या डब्यातून सातारा येथून मिरजला आणि त्यानंतर चौथ्या टप्प्यात मिरज ते बेळगाव मालगाडीमधील गार्डच्या डब्यातून औषध घरपोच पोहोचविण्यात आले. औषधे मागवण्यासाठी अनेकजण समाजमाध्यामांची मदत घेत असून मध्य रेल्वेच्या ट्वीटर प्रोफाईलवर अनेक रुग्ण आणि त्यांच्या परिवारांकडून औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.

बेळगावातही पोहोचवले औषध

औषधाच्या वाहतुकीचा संपूर्ण समन्वय मुंबई विभाग पार्सल निरीक्षकांनी केले होते. शेवटी दोन रूग्णांसाठीचे औषध पाकिटे तीन वेगवेगळ्या ट्रान्स-शिपमेंटच्या टप्प्यांनंतर बेळगाव येथे मध्यरात्री १ वाजता स्थानकातील स्टेशन मॅनेजर यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यावर एक औषध रक्ताचे कर्करोग असलेल्या ६९ वर्षे वयाच्या रुग्णाला तर जी एअरफोर्समध्ये सेवा देणाऱ्या एका व्यक्तीच्या ४७ वर्षीय आईला औषध पुरवण्यात आले. 

माझ्या वडिलांना रक्ताच्या कर्करोगाच्या औषधाची तीव्र गरज असताना, या कठीण दिवसांत भारतीय रेल्वेने जी सेवा दिली आहे त्याबद्दल मी शब्दात वर्णन करू शकत नाही. मी भारतीय रेल्वेचा आभारी आहे आणि त्यांनी अशीच सेवा पुढे चालू ठेवली पाहिजे, असे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.

संपादन - अमित गोळवलकर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख