कोरोनानी जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना दिलासा - Anil Deshmukh Gives relief to Police Families | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनानी जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना दिलासा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 जून 2020

''कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या  कुटुंबीयांनी त्यांच्या डोक्यावरील छताची चिंता करू नये,'' अशी घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. 

मुंबई : ''कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या  कुटुंबीयांनी त्यांच्या डोक्यावरील छताची चिंता करू नये,'' अशी घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. 

कोविड -१९ मुळे मृत्यू पावलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत गृहमंत्री म्हणाले, ''सरकारने माणुसकीच्या नात्याने हा निर्णय घेतला आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या बदल्यात आपण कमीत कमी एवढे तरी करु शकू,"

''कोविड -१९ च्या अनुषंगाने कर्तव्यावर असताना ४२८८ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३२३९ जण पूर्णतः बरे झाले आहे ही आनंददायक बाब आहे. परंतु ५१ जणांचा बळी देखील गेला आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे." अशा भावना देशमुख यांनी व्यक्त केल्या. 

दरम्यान, कोणत्याही युद्धात लढणाऱ्या वीरांनाही धीर देण्याची, त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे, ते एकटे नाहीत हे दाखवून देण्याची आवश्‍यकता असते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आतापर्यंत राज्यातील वीसहून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला आहे. उद्देश एकच की, पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने युद्धमैदानावरच्या पोलिसांना भेटायचे, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आणि पोलिस दलास अधिक कार्यक्षम कसे करता येईल याच्या उपाययोजना करायच्या, हे त्यांनी अव्याहतपणे सुरु ठेवले आहे. 

या कोरोना युद्धात पोलिसांवरची जबाबदारी मोठी आहे. सुरक्षा, बंदोबस्त ही नेहमीची कामे आहेत. पण लॉकडाऊन यशस्वी करणे हे मोठे काम त्यांच्यावर सोपविण्यात आलेले आहे. त्याचबरोबर परराज्यांतील नागरिकांना परत आणणे आणि येथील परप्रांतीय कामगारांना त्यांच्या-त्यांच्या गावी पोचविण्याची व्यवस्था करणे ही कामेही पोलिसांवर सोपविण्यात आलेली आहेत. एकीकडे कामाचा हा ताण आणि दुसरीकडे इतरांप्रमाणेच सामान्य पोलिसांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात असलेले कोरोनाचे भय. यातून पोलिसांचे मनोधैर्य कायम ठेवणे आवश्‍यक असल्याचे ओळखून अनिल देशमुख हे स्वतः आघाडीवर उतरले आहेत. 

पोलिसांसाठी विशेष कोव्हिड हेल्पलाईन

पोलिसांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा, विशेष कोविड-१९ हेल्पलाईन, पोलिसांना प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप, ५५ वर्षांवरील पोलिसांना पूर्णपणे सुटी, त्याच सोबत ५० वर्षांवरील पोलिसांचा सामान्य नागरिकांशी संपर्क येईल अशी कामे न देणे, या सर्व बाबी याच पोलिस संपर्काचा परिपाक आहेत. देशमुख यांच्या सूचनेनुसार मुंबई पोलिस आयुक्तालयामार्फत देखील पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष कोव्हिड हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. दहा अतिरिक्त पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रात दहा कोव्हिड कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख