कोशियारींपासून फडणवीसांपर्यत अन्‌ पवारांपासून थोरातांपर्यंत ‘नार्वेकर’ नावाची चलती!

नार्वेकर मालाडमधून विधानसभा लढवणार की परिषदेवर जाणार की उद्धव ठाकरे यांचा विश्वासू सहकारी ही जबाबदारीच सांभाळणार, या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात असेल.
This is a review of Milind Narvekar's personality on the occasion of his birthday
This is a review of Milind Narvekar's personality on the occasion of his birthday

मुंबई  ः मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे महाराष्ट्रातल्या सर्व महत्वाच्या मुव्हर्स अॅण्ड शेकर्सच्या संपर्कात असतात. आज मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सावली म्हणून ते गेली कित्येक वर्षे वावरत आहेत. संयत शांत उद्धव अन्‌ कायम उत्साहात वावरणारे त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर अशी जोडगोळीच म्हणा ना. रश्मी ठाकरे यांच्या खालोखाल उद्धव ठाकरे यांच्यासोबत सतत वावरणारी व्यक्ती म्हणजे मिलिंद नार्वेकर. प्रत्येक मोठ्या नेत्यासमवेत असा स्वीय सचिव असतोच. वेळेचे, संपर्काचे आणि संबंधाचे व्यवस्थापन सांभाळायला, अशा कुणाची तरी गरज असतेच. पण नार्वेकर हे अजब रसायन आहे. उद्धव ठाकरे यांना अचूक फीडबॅक देताना त्यांनी स्वत:चेही एक फॅन फॉलोअिंग तयार केले आहे. उद्धव ठाकरेंना पूरक असणारे. (This is a review of Milind Narvekar's personality on the occasion of his birthday)

मिलिंद नार्वेकर यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या वाटचालीचा, त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्याबाबत चर्चिल्या जाणाऱ्या गोष्टींचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा धांडोळा. नार्वेकर हे प्रत्येक वाढदिवसाला ‘मातोश्री`वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘सिंहासना’ला नमन करतात. आजही त्यांनी तो प्रघात पाळला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य आणि रश्मी ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. तेजस ठाकरे यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

एकेकाळी मातोश्रीवरचे सत्ताकेंद्र असलेल्या नार्वेकरांना खरे तर मालाडच्या शिवसेना शाखेचे प्रमुख व्हायचे होते. त्यासाठी मुलाखत द्यायला गेलेले नार्वेकर यांना उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या अनौपचारिक कार्यालयात घेतले. त्यानंतर त्यांना कधीही मागे वळून बघावे लागले नाही. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडाच्या वेळी नार्वेकर टीकेचे धनी झाले. उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे नार्वेकरांशिवाय पान हलत नाही, इथंपासून ते नार्वेकर म्हणजे चहापेक्षा किटली गरम अशी टीका झाली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही नार्वेकरांचे प्रस्थ आवडत नसे म्हणतात, आदित्य ठाकरे यांच्या चमूतही नार्वेकर यांना स्थान नाही, अशा चर्चाही रंगत असतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळिकीमुळे त्यांचे पूर्वीचे महत्व कमी झाल्याची चर्चाही आहेच. या सगळ्या वदंतांची नार्वेकर किती फिकीर करतात माहित नाही. पण, उद्धव आणि त्यांचे द्वैत आजही कायम दिसते, हे खरे. कोविड काळातल्या प्रत्येक दौऱ्यात नार्वेकर समवेत होतेच.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पूर्वी शिवसेनेशी संपर्क साधत तो नार्वेकरांच्या माध्यमातूनच. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मुंबई पालिकेबद्दल उद्धव ठाकरेंशी बोलायचे आहे, हा निरोप जाई तोही नार्वेकरांनाच अन आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात नार्वेकरांची पत घसरली आहे, असे चित्र असतानाही विधान परिषदेच्या रिंगणात कॉंग्रेसने उमेदवार उतरवला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:चा अर्ज सादरही करणार नाहीत, हा निरोप कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पोचवला तो नार्वेकरांनीच.

स्वीय सचिव या पदापुरते मर्यादित न रहाता नार्वेकरांना आता शिवसेनेचे सचिव नेमण्यात आले आहे. तिकीटवाटप मग ते महापालिका निवडणुकीचे असो किंवा विधानसभेचे नार्वेकरांना सगळे माहित असते. काही वेळा त्यांची त्यात भूमिकाही असते, असे बोलले जाते. आजही ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतात.

आशीषकुमार सिंग आणि विकास खारगे हे दोन उत्तम प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार हाकतात, तेव्हा संघटनेतील काही बाबींविषयी माहिती मिळवायची असेल तर नार्वेकरांनाच विचारले जाते. राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडूनही संपर्क साधला जातो अन मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे आजही नार्वेकरांना आपला विश्वासू मानतात.

ठाकरे पती-पत्नीच्या मनात स्थान असलेल्या नार्वेकरांना कधी शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर कार्यालय कुठे उघडू विचारायला फोन करतात, तर कधी बदलीबाबत अडलेला पोलिस अधिकारी सीएमसाहेबांची भेट घडवून द्या, असं आर्जव करतो. या सर्व उठाठेवी करताना ते सकाळी जिमला हजेरी लावतात. कधीतरी शांत सायंकाळी उद्योगपतींसमवेत गप्पा रंगवतात. प्रत्येकाच्या मनाचे गूज त्यांच्यासमोर उलगडले जाते, हे मात्र खरे.

महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या पत्नी मीरा आणि दोन मुले हे त्यांचे विश्व. राज्यपाल भगतसिंह कोशियारी त्या वादग्रस्त आमदार नेमणुकीत नार्वेकरांचे नाव असेल, तर १२ पैकी काही नावांना मंजुरी देतील, असे गंमतीने म्हटले जाते. नार्वेकर मालाडमधून विधानसभा लढवणार की परिषदेवर जाणार की उद्धव ठाकरे यांचा विश्वासू सहकारी ही जबाबदारीच सांभाळणार, या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात असेल. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com