भाजपच्या ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी कधी करणार - सचिन सावंत (व्हिडिओ) - When NCB will probe BJP drug connection asks Congrss Leader Sachin Sawant | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी कधी करणार - सचिन सावंत (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

बॉलीवूड व ड्रग कनेक्शनची चौकशी करावी, असेही भाजपचे म्हणणे आहे. मात्र गेले पाच वर्षे फडणवीस सरकार असताना एनसीबीचे कार्यालय आणि बॉलिवूड मुंबईतच होते. मग तेव्हा एवढी वर्षे त्यांची चौकशी का झाली नाही, बायोपिक पोस्टर प्रसिद्ध करताना हजर असलेल्या संदीपसिंह याचा संबंध काय होता, या बाबींची उत्तरे आता मिळाली पाहिजेत, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात उलटसुलट विधाने करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे तोंड एव्हाना पूर्णपणे काळे झाले आहे. आता भाजपच्या ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी केव्हा करणार, असा प्रश्न प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. 

''सुशांतसिंह तपासप्रकरणात काही अभिनेत्रींच्या वॉट्सप चॅटवर गंभीर संभाषण असल्याचे आता एनसीबी चौकशीत उघड झाले आहे. मग मुंबई पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास ६५ दिवस असताना अंमली पदार्थांसंदर्भातील एवढी महत्वाची माहिती राज्य सरकारने दडवून का ठेवली. तरुणांसाठी अत्यंत गंभीर असलेला हा विषय राज्य सरकारच्या नजरेतून सुटला की त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आले. अशाच वागण्यामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे,'' असे पत्र भाजपच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना दिले आहे.  त्यासंदर्भात सावंत यांनी भाजप ला हा टोला लगावला आहे.  

याबाबत त्यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसिद्ध केला आहे. ''हे पत्र देताना भाजप नेत्यांमध्ये एवढी लज्जाहीनता कशी आली याचे राहून राहून आश्चर्य वाटते. गिरे तो भी टांग उपर, अशी त्यांची भूमिका यातून दिसते. तोंड काळे झाले तरी हात स्वच्छ आहेत हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. खरे पाहता हा सर्व त्यांचा कांगावा सुरु आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा आणि एनसीबी च्या अमली पदार्थ चौकशीचा काहीही संबंध नाही हे आता स्पष्ट झाले आहे. तरीही आता जे काही सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे, त्यातून एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे की भाजपच्या ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी केव्हा करणार,''असे सावंत यांनी विचारले आहे. 

''बॉलीवूड व ड्रग कनेक्शनची चौकशी करावी, असेही भाजपचे म्हणणे आहे. मात्र गेले पाच वर्षे फडणवीस सरकार असताना एनसीबीचे कार्यालय आणि बॉलिवूड मुंबईतच होते. मग तेव्हा एवढी वर्षे त्यांची चौकशी का झाली नाही, बायोपिक पोस्टर प्रसिद्ध करताना हजर असलेल्या संदीपसिंह याचा संबंध काय होता, या बाबींची उत्तरे आता मिळाली पाहिजे,'' असे  सांगून सावंत पुढे म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरणात भाजपचे तोंड काळे झाले आहे. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली असून जनता त्यांना कदापीही माफ करणार नाही. मुंबई पोलिसांची सुरक्षा घेऊन मुंबई पोलिसांनाच बदनाम करणाऱ्या या नेत्यांचे चेहरे बघून ठेवा. हा दुटप्पीपणा जनता कायम लक्षात ठेवेल हे नक्की.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख