चिपळूणमध्ये नगराध्यक्ष - महाआघाडीचे जुळणार का सूर? - What will be the Scenario in Chiplun City Council Election | Politics Marathi News - Sarkarnama

चिपळूणमध्ये नगराध्यक्ष - महाआघाडीचे जुळणार का सूर?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

येथील पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीने पालिकेवर वर्चस्व मिळवले; मात्र भाजपकडे नगराध्यक्षपद आहे. शेवटच्या टप्प्यात विकासाच्या मुद्‌द्‌यावर महाविकास आघाडी आणि नगराध्यक्ष यांचे सूर मिळणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

चिपळूण : येथील पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीने पालिकेवर वर्चस्व मिळवले; मात्र भाजपकडे नगराध्यक्षपद आहे. शेवटच्या टप्प्यात विकासाच्या मुद्‌द्‌यावर महाविकास आघाडी आणि नगराध्यक्ष यांचे सूर मिळणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

चिपळूण पालिकेची पंचवार्षिक निवडणूक जेमतेम दहा महिन्यांवर आली आहे. साडेचार वर्षांपूर्वी पालिकेची निवडणूक झाली. तेव्हा भाजपला नगराध्यक्षपदासह पाच नगरसेवकपदांची लॉटरी लागली होती. सुरेखा खेराडे नगराध्यक्ष आणि एका प्रभागातून विजयी झाल्या होत्या. नंतर त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. भाजपने शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही दोन महत्त्वाची पदे भाजपने आपल्याकडे ठेवली. स्थायी समितीवर ही भाजपचेच वर्चस्व होते; भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेकडून पहिल्या वर्षापासून सतत प्रयत्न सुरू होते. 

त्याला यश येऊ नये, म्हणून भाजपने विषय समित्यांचे सभापतिपद कॉंग्रेस, राष्ट्रवादीला देऊन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला. परंतु, कॉंग्रेसचा उपनगराध्यक्षपदावर डोळा होता. उपनगराध्यक्षपद कॉंग्रेसला देण्याबाबत ठरले नव्हते, असे कारण देत, भाजपचे निशिकांत भोजने उपनगराध्यक्षपद सोडण्यास तयार नव्हते. राज्यात सत्ताबदल होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आली. तोच पॅटर्न चिपळूण पालिकेत राबवण्यात आला.

नगराध्यक्षांना बडतर्फ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या; मात्र नगराध्यक्षा कायद्याच्या कचाट्यात कुठेही आल्या नाहीत. नगराध्यक्षांना बडतर्फ करण्याची खेळी वगळता, महाविकास आघाडीच्या सर्वच खेळी यशस्वी झाल्या. त्यामुळे भाजपकडे आता नगराध्यक्षपद आहे, तर महाविकास आघाडीकडे विषय समित्या. त्यामुळे पुढील काळात विकासकामांचे नियोजन करताना महाविकास आघाडीला नगराध्यक्षांना विश्‍वासात घ्यावे लागणार आहे.

आता अल्प कालावधी शिल्लक आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहरात भरीव निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल. शहर विकासाच्या मुद्‌द्‌यावर आम्ही नगराध्यक्षांना शंभर टक्के सहकार्य करणार.
-मोहन मिरगल, नगरसेवक शिवसेना

माझी बांधिलकी चिपळूण शहरासाठी आहे. पेठमाप-मुरादपूर पुलासाठी आमदार शेखर निकमांनी निधी दिल्यानंतर आम्ही त्याचे स्वागत करून पुढील कार्यवाही सुरू केली. शहर विकासासाठी निधी येणार असेल तर त्याचे स्वागत केले जाईल.
-सुरेखा खेराडे, नगराध्यक्ष.

दृष्टिक्षेपात..
महाआघाडी राज्यात सत्तेवर
तोच पॅटर्न चिपळूण पालिकेत राबवला
भाजपकडे आता नगराध्यक्षपद
महाविकास आघाडीकडे विषय समित्या
पुढील काळात विकासकामांचे नियोजन महत्वाचे
महाआघाडीला नगराध्यक्षांना विश्‍वासात घ्यावे लागेल
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख