Water Supply Minister Gulabrao Patil's criticism on BJP's agitation | Sarkarnama

भाजपचे आंदोलन म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड : गुलाबराव पाटील 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 22 मे 2020

भारतीय जनता पक्षाला आता बाजारात किंमत नसल्यामुळे चेहरे दाखविण्यासाठी त्यांनी आंदोलनाची ही जत्रा भरविली आहे. त्यांचे हे आंदोलन म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड आहे.

जळगाव : राज्यातील सरकार अत्यंत चांगले काम करीत आहे, जनतेच्या विश्‍वासालाही ते पात्र ठरले आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला आता सरकारचे चांगले काम पहावत नाही, त्यामुळे ते आंदोलन करीत आहेत. भारतीय जनता पक्षाला आता बाजारात किंमत नसल्यामुळे चेहरे दाखविण्यासाठी त्यांनी आंदोलनाची ही जत्रा भरविली आहे. त्यांचे हे आंदोलन म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड आहे, असा टोला शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. 

राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर "मेरा आंगण, मेरा रणांगण' आंदोलन आज करण्यात आले आहे. यात राज्यभरातील नेत्यांनी सरकारचा निषेध म्हणून काळे कपडे परिधान करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनावर राज्याच्या मंत्रिमंडळातील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी खरमरीत टीका केली. 

भारतीय जनता पक्षाचे हे आंदोलन म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत ते म्हणतात की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सरकार व प्रशासकीय यंत्रणा कोरोना विरोधातील लढाईच्या मुकाबला मोठा धैर्याने करीत आहे. राज्यात साडेदहा हजारापेक्षाही अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेचे हे मोठे यश आहे. 

राज्यात कोरोनाचे संकट असताना उन्हाळा आहे. अशा स्थितीत अनेक पाणी टंचाईचा प्रश्‍न निर्माण होतो, मात्र प्रशासनाने व्यवस्थित उपाययोजना केली आहे, त्यामुळे आजच्या स्थितीत एवढ्या मोठ्या संकट काळातही जनतेला पाणी टंचाईला सामना करावा लागला नाही.

राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी सरकारने सीसीआयच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू केले आहेत. तसेच, मका खरेदी केंद्रही सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या या सरकारवर आज जनतेचा विश्‍वास आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला बाजारात किंमत उरली नसल्यामुळे जनतेला चेहरे दाखविण्यासाठी आंदोलनाची ही जत्रा भाजपने भरविली आहे. 

भारतीय जनता पक्षाने सीएम फंडला एक पैसाही दिलेला नाही, त्यांनी सर्व पैसा पीएम फंडला दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवर बोलण्याचा या पक्षाला कोणताही अधिकार नाही.

हा पक्ष केवळ राजकारण करीत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सर्व ओळखून आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या या आंदोलनाला राज्यातील जनतेने सोशल मीडियावर "ट्रोल' केले आहे. जनतेचा हा कौल लक्षात घेऊन तरी त्यांनी हे आंदोलन बंद केले पाहिजे होते. परंतु या पक्षाला केवळ राजकारणच करावयाचे आहे. त्यामुळे त्यांचे राजकारण त्यांनाच लखलाभ होवो. मात्र महाराष्ट्रातील जनता या पक्षाला निश्‍चित धडा शिकवेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख