राजापूर : रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर न जाता गुहागर किंवा रायगड येथे प्रस्तावित असल्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधून जोरदार विरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाची स्वप्ने कुणी पाहू नयेत, असे म्हणणारे खासदार राऊत आता हा प्रकल्प रायगड व गुहागर येथे प्रस्तावित करण्याची स्वप्ने पाहू लागले, असा टोला शिवसेनेचे माजी विभागप्रमुख राजा काजवे यांनी लगावला.
चिपळूण येथे पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही तर रायगड किंवा गुहागरमध्ये प्रस्तावित असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे सागवेचे माजी विभागप्रमुख काजवे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, "रिफायनरी प्रकल्पाबाबत आमदार राजन साळवी यांनी यापूर्वी जनतेचे मत मांडले होते. त्या वेळी खासदार राऊत यांनी "ते' आमदार साळवी यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले होते. मग आता रिफायनरी प्रकल्प रायगड वा गुहागर येथे प्रस्तावित करण्याबाबत त्यांनी मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक आहे की त्यांनी "मातोश्री'शी चर्चा करून व्यक्त केले का?'' खासदार राऊत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थानिक पातळीवरच्या घडामोडींबाबत चुकीची माहिती देत त्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही काजवे यांनी केला आहे.
तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून गेल्या वर्षभरापासून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून लोकांना प्रकल्प नको असेल तर विरोध अशी भूमिका घेतली जात असताना स्थानिक पातळीवरील सेना पदाधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले जात आहे. त्याचे प्रतिबिंब खासदार राऊत यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्यावरून उमटलेल्या प्रतिक्रियेमध्ये पुन्हा एकदा दिसून आले.
त्या ठिकाणी जनता राहत नाही का?
नाणार परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प झाल्यास खासदार विनायक राऊत यांना विनाश होताना दिसतो. मग, गुहागर किंवा रायगड येथे प्रकल्प उभारणी झाल्यास त्या ठिकाणी विनाश होणार नाही का? त्या ठिकाणी जनता राहत नाही का? असा सवाल काजवे यांनी उपस्थित केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

