भाजपशी दोन हात करू इच्छिणारे ठाकरे कोरोनाविरोधातील लढाईत अपयशी 

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिवसाला तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे कोरोना वाढत चालला आहे. भारतीय जनता पक्षासोबत दोन हात करू इच्छित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा सामना करू शकलेले नाहीत.
भाजपशी दोन हात करू इच्छिणारे ठाकरे कोरोनाविरोधातील लढाईत अपयशी 
Uddhav Thackeray fails in battle against Corona

मुंबई : ''महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिवसाला तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. राज्य सरकारच्या बेशिस्तपणामुळे कोरोना वाढत चालला आहे. भारतीय जनता पक्षासोबत दोन हात करू इच्छित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा सामना करू शकलेले नाहीत,'' अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते.

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतला आहे. पण, महाराष्ट्र सरकारने मात्र राज्यातील मजुरांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, लघु उद्योजकांना मदत करण्यासंबंधी कोणतेही पाऊल उचलले नाही. उद्धव ठाकरे हे भाजपशी दोन हात करू इच्छित आहेत. पण, ते कोरोनाचा यशस्वीपणे सामना करू शकलेले नाहीत. सरकारच्या बेशिस्त पणाने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. असा आरोप रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. 

सध्या कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. अशा धोकादायक परिस्थितीत राज्यातील शाळा सुरू करू नयेत. तीन महिन्यानंतर कोरोनाचा धोका टळल्यानंतर शाळा सुरू करण्यास हरकत नाही; अन्यथा पुढील वर्गात सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट करणे, असा निर्णय घेऊन या वर्षी शाळा सुरू करण्याची घाई करू नये. ज्या शाळा सुरू नसताना पालकांना शुल्क भरण्यास दबाव टाकला जात असेल तर अशा शाळांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी सूचनाही आठवले यांनी केली आहे. 

राज्यात अंतिम वर्षाच्या पदवीच्या परीक्षा घेणे आवश्‍यक आहे. मात्र त्या परीक्षा आता न घेता कोरोनाचा धोका टळल्यानंतरच घ्याव्यात. याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचा आदर राखला पाहिजे. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यांना काहीच अधिकार नाहीत, अशी कोणी भूमिका घेऊ नये. मुख्यमंत्री जसे राज्याचे प्रमुख असतात, तसेच घटनात्मकदृष्ट्या राज्यपालही राज्याचे प्रमुख असतात, असे रामदास आठवले म्हणाले. 

या वेळी रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सुरेश बारशिंग, चंद्रकांता सोनकांबळे, सुरेश निकाळजे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in