मुंबई पोलिसांच्या बदनामी प्रकरणी दोन गुन्हे दाखल - Two Offences Registred by Cyber Crime Cell about Defaming Mumbai Police | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई पोलिसांच्या बदनामी प्रकरणी दोन गुन्हे दाखल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

बोगस खाती उघडून बदनामी केल्याप्रकरणी आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी सायबर पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या पोलिस उपायुक्त रश्‍मी करंदीकर यांनी दिली

मुंबई : बहुचर्चित सुशांतसिंह राजपूत प्रकरणात 'एम्स'च्या अहवालात सुशांतचा मृत्यू कोणत्याही घातपाताने झाला नसल्याचे स्पष्ट झाले; मात्र या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची काहींनी जाणीवपूर्वक बदनामी केल्याचे पुढे आले आहे.

याप्रकरणी सायबर पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवल्याची माहिती पोलिस उपायुक्त (सायबर) रश्‍मी करंदीकर यांनी दिली. या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी तब्बल 80 हजार बोगस खाती बनवण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सोशल मीडियावर काहींनी मुंबई पोलिस आणि राज्य सरकारविषयी चुकीची माहिती सादर केली. या सर्व घटनांमागे कोण आहेत, त्याचा आता पोलिस शोध घेत असल्याचे आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. पोलिसांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू. बदनामीसाठी अनेक बोगस खाती तयार केली. त्याद्वारे पोलिसांची बदनामी केली. त्याचा सर्व तपास सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. काही प्रसिद्धिमाध्यमांनीही मुंबई पोलिसांविरोधात एक मोहीम चालवली. १६ जूनला सुशांतच्या कुटुंबीयांच्या विधानामध्येही त्यांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले; पण कुटुंबातील सदस्य चौकशीसाठी आले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता याप्रकरणी बोगस खाती उघडून बदनामी केल्याप्रकरणी आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी सायबर पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या पोलिस उपायुक्त रश्‍मी करंदीकर यांनी दिली.

मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले. यामागे कोण आहेत, याचा तपास केला जात आहे. आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केला होता आणि ते समाधानी होते. सत्य हे कायम सत्यच असते - परमबीर सिंह, पोलिस आयुक्त

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख