Towards Mumbai Analog ... When will the journey to Pune start? | Sarkarnama

मुंबई अनलॉगच्या दिशेने...पुण्याची वाटचाल कधी सुरू होणार?

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 30 जुलै 2020

मुंबई शहरातील कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.९३ टक्‍क्‍यांवर आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून तो देखील ७५ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोरोना नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. परिणामी, मुंबईचा अनलॉकचा मार्गही यामुळे सुकर झाल्याचे चित्र आहे. 

मुंबई : मुंबई शहरातील कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.९३ टक्‍क्‍यांवर आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून तो देखील ७५ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोरोना नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. परिणामी, मुंबईचा अनलॉकचा मार्गही यामुळे सुकर झाल्याचे चित्र आहे. 

मुंबई शहरातील कोरोना रुग्णाची संख्या कमी होत असली तरी राज्यातील पुण्यासह इतर शहरात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात मागील काळाच्या तुलनेत सद्य परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईची वाटचाल अनलॉगच्या दिशेने होत असली तरी पुण्यासह इतर शहरे आणि राज्य कधी अनलॉग होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसते. एकूण बाधित रुग्णांचा आकडा हा एक लाखाच्या पार गेला असला तरी मुंबईत केवळ १७ हजार ८६२ ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८५ हजार ३२७ पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या ५ लाखांच्या वर गेली आहे. ता. २८ जुलै रोजी ११ हजार ६४३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. 

मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढली असली तरी रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मुंबईतील २४ वॉर्डपैकी १८ वॉर्डमध्ये एक टक्‍यापेक्षा कमी दर आहे. मुंबईतील रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी ७५ दिवस झाला आहे. १४ वॉर्डमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी ७२ दिवसांपेक्षा अधिक आहे. त्यातही चार विभागांत ९० दिवसांपेक्षा अधिक, तर दोन विभाग १०० दिवसांपेक्षा अधिक रुग्ण दुपटीचा कालावधी आहे. 

मुंबई शहर रुग्णवाढ आटोक्‍यात आली आहे; तर उपनगरांतील काही परिसरांत रुग्ण आढळत आहे. मात्र तिथलाही रुग्णवाढीचा दर हा २ टक्‍क्‍यांच्या आत आहे. उपनगरांतील कंटेन्मेंट झोन मधील रुग्णवाढीवर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असून अँटीझेन चाचण्या सुरू केल्या आहेत. या माध्यमातून उपनगरांतील परिस्थिती आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतर मुंबईत अनलॉकच्या हालचाली सुरू होणार असल्याचे समजते. 

राज्याच्या इतर शहरांतील आणि ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाला या भागाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख