फडणवीस चार वाजता कोणता राजकीय स्फोट घडविणार? 

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा उद्रेक आणि राज्याच्या राजकारणाबाबतही उलट-सुलट चर्चांना उधाण आले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दुपारी चार वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. अलीकडेच घडलेल्या राजकीय घडामोडींवर फडणवीस नेमकी काय भूमिका मांडतात? या कडे राजकीय पटलासह राज्याचे लक्ष असणार आहे.
 State's attention to Devendra Fadnavis' press conference
State's attention to Devendra Fadnavis' press conference

मुंबई ः कोरोनाच्या प्रादुर्भावाचा उद्रेक आणि राज्याच्या राजकारणाबाबतही उलट-सुलट चर्चांना उधाण आले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दुपारी चार वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत ठाकरे सरकारवर निशाणा साधताना अलीकडेच घडलेल्या राजकीय घडामोडींवर फडणवीस नेमकी काय भूमिका मांडतात? या कडे राजकीय पटलासह राज्याचे लक्ष असणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भवनाकडे नेत्यांची रीघ लागली असून यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही राज्यपाल भवनातील हजेरी आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली चर्चा, यावरून राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याचा कयास लावला जात आहे. त्यातच या सर्व प्रकारात कॉंग्रेसचे कुठेच नसणे, हेही चर्चेला खतपाणी घालणारे आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या भूमिकेची उत्सुकता आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संवाद न ठेवता थेट राज्यपालांची भेट घेण्याचा सिलसिला फडणवीस यांनी सुरू ठेवला होता. त्याचीही चर्चा राजकीय वर्तुळातून अजून थांबलेली नाही. तसेच, राज्य सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाच्या टायमिंगबाबत अनेकांनी चर्चा केली असली तरी पॅकेज जाहीर करण्याची या आंदोलनाच्या प्रमुख मागणीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले होते. शिवाय हे भाष्य करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदी सरकारच्या पॅकेजवरही टीकेचे बाण सोडले होते. याला फडणवीस उत्तर देण्याची शक्‍यता आहे. 

अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी मागणी केल्याप्रमाणे रेल्वे गाड्या मिळत नाहीत, या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दाव्यावरही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झालेल्या आहेत. त्यावर राज्याने रेल्वेकडे नेमक्‍या किती गाड्यांची मागणी केली होती, याबाबतही फडणवीस राज्य सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्‍यता आहे. 

पहिल्यांदा गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावा : संजय राऊत 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले. 

कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है...विरोधकांनी तत्काळ quarantine व्हावे, हेच बरे...महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील....Boomerang..., असे म्हणत राऊत यांनी भाजपला चिमटा काढला आहे. 

राज्यात गेली दोन दिवस राजकीय घडामोडी घडत आहेत. विविध नेते राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यातून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागेल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याबाबतही राऊत यांनी भाष्य केले. ""राष्ट्रपती राजवटीसाठी सर्वात सक्षम केस ही गुजरातची आहे. सुरुवात तिथून व्हायला हवी. कालच गुजरात हायकोर्टानं जे निष्कर्ष काढलेत, तिथले हॉस्पिटल्स म्हणजे अंधारकोठड्या झाल्यात असं म्हटलं. त्यानंतर खरंतर तिथल्या राज्यपालांनी हालचाल करायला पाहिजे,'' असेही राऊत म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com