एजाज लकडावाला म्हणतो....इतक्या जणांना धमकावलंय! - Statement By Ejaj Lakdawala puts challenge before Mumbai Police | Politics Marathi News - Sarkarnama

एजाज लकडावाला म्हणतो....इतक्या जणांना धमकावलंय!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

एजाजविरोधात हत्या व खंडणीसारख्या ८० हून अधिक तक्रारी असून मुंबईत २५ गुन्ह्यांची नोंद आहे. २००४ मध्ये गॅंगस्टर लकडावालाने पश्‍चिम उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावले होते. सुरुवातीला ५० लाखांची खंडणीची मागणी करणाऱ्या लकडावालाने शेवटी ती रक्कम ५० हजारांवर आणली होती. अखेर त्याबाबत पोलिसांमध्ये तक्रार आल्यानंतर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले

मुंबई : गॅंगस्टर एजाज लकडावाला याला पश्‍चिम उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली होती. २००४ मध्ये घडलेल्या गुन्ह्याबाबत त्याची चौकशी करण्यात आली. मात्र, आतापर्यंत एवढ्या जणांना धमकावलंय, त्यामुळे आता आठवतही नाही, असे सांगून त्याने पोलिसांसमोरच तपासाचे आव्हान उभे केले आहे.

एजाजविरोधात हत्या व खंडणीसारख्या ८० हून अधिक तक्रारी असून मुंबईत २५ गुन्ह्यांची नोंद आहे. २००४ मध्ये गॅंगस्टर लकडावालाने पश्‍चिम उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावले होते. सुरुवातीला ५० लाखांची खंडणीची मागणी करणाऱ्या लकडावालाने शेवटी ती रक्कम ५० हजारांवर आणली होती. अखेर त्याबाबत पोलिसांमध्ये तक्रार आल्यानंतर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.

तेव्हा लकडावाला सोडून इतर आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते. अखेर धमकीप्रकरणी त्याचा ताबा गुन्हे शाखेच्या कक्ष-९ च्या पोलिसांनी घेतला होता. सध्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण तत्पूर्वी त्याची चौकशी करण्यात आली. "२००४ मधले काही आठवत नाही. एवढ्या जणांना धमकावलंय की आता आठवतही नाही,' असे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले.

पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर दोन हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच गुन्ह्यात तो अटकेत असताना १९९७ मध्ये त्याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात आणले असताना पोलिसांना हुलकावणी देऊन त्याने पळ काढला होता.

बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजच्या मदतीने परदेशातून कॉल
हॉटेल व्यावसायिकाला २००४ मध्ये एजाज लकडावालाने धमकी दिली होती. त्यावेळी तो मलेशियामध्ये होता. पण सुरक्षा यंत्रणांच्या रडावर येऊ नये म्हणून त्या वेळी तो अंधेरीतील बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजचा वापर करायचा. टेलिफोन एक्‍स्चेंजच्या मदतीनेच लकडावाला कॉन्फरन्स कॉलद्वारे खंडणीसाठी धमकवायचा. त्यामुळे त्याचे लोकेशन अंधेरी येत होते. अंधेरीतून टेलिफोन एक्‍स्चेंजवर कारवाई झाल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला होता.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख