Start a medical shop at the every bus station | Sarkarnama

महसुलासाठी मनसेचे बाळा नांदगावकर यांची सूचना सरकार स्वीकारणार का? 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 22 मे 2020

संपूर्ण राज्यभरात असलेल्या प्रत्येक बस स्थानकामध्ये ज्या प्रमाणे कॅन्टीन व बुक शॉप आहे, त्याच धर्तीवर प्रत्येक तालुक्‍यांतील बस स्थानकात मेडिकल दुकान चालू करण्याचा विचार महामंडळाने त्वरित करावा. 

पुणे : कोरोनामुळे गेली दोन महिने राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) कोट्यवधी रुपयांचा आर्थिक तोटा झाला आहे. तो भरून निघावा आणि एसटी महामंडळाला अधिकचा महसूल मिळावा, या साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक अनोखी संकल्पना राज्य सरकारपुढे मांडली आहे. 

संपूर्ण राज्यभरात असलेल्या प्रत्येक बस स्थानकामध्ये ज्या प्रमाणे कॅन्टीन व बुक शॉप आहे, त्याच धर्तीवर प्रत्येक तालुक्‍यांतील बस स्थानकात मेडिकल दुकान चालू करण्याचा विचार महामंडळाने त्वरित करावा, अशी मागणी नांदगावकर यांनी ट्विटच्या माध्यमातून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. 

या विषयी अधिक माहिती देताना बाळा नांदगावकर यांनी या योजनेचे प्रामुख्याने तीन फायदे सांगितले आहेत. यामध्ये एसटी महामंडळाला या मेडिकल दुकानांच्या माध्यमातून दर महिन्याला भाडे स्वरूपात महसूल मिळेल. या दुकानासाठी घेण्यात येणारी अनामत रक्कम (डिपॉझिट) वेगळी असेल. त्याचा वापर दुकानदार त्या दुकानाचा ताबा सोडेपर्यंत करता येऊ शकतो. 

या शिवाय अनेकदा नागरिकांना अचानकपणे प्रवास करावा लागतो, अशावेळी त्यांना आवश्‍यक औषधे लागल्यास ते सहजरित्या उपलब्ध होतील. याशिवाय औषधे सहज मिळत असल्यामुळे अनेकांना विनाकारण औषधे दुकानांची चौकशी करण्यात जाणारा वेळ वाचणार आहे. या दुकानांच्या माध्यमातून शेकडो नवीन बेरोजगारांना स्वयंरोजगारची संधी उपलब्ध होईल, असे नांदगावकर यांनी त्यात म्हटले आहे. ही योजना राबविताना त्यात भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली आहे. 

बस स्थानक तेथे मेडिकल दुकान या योजनेद्वारे परिवहन महामंडळाला वार्षिक कोट्यवधी रुपयांचा महसूल नव्याने मिळणार आहे. त्यासाठी परिवहन महामंडळाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ह्या मागणीचा राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी तातडीने विचार करावा, अशी विनंती नांदगावकर यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख