#SSRSuicide : BJP MLA fires questions on Mumbai police | Sarkarnama

#SSRSuicide : भाजप आमदाराचा मुंबई पोलिसांवर पत्रातून प्रश्‍नांचा भडिमार 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या आत्महत्येनंतर त्याला धमक्‍या आल्या होत्या का? सुशांतच्या घरी आत्महत्येच्या आदल्या रात्री पार्टी झाली होती का? त्यात कोण उपस्थित होते? त्याने सीमकार्ड का बदलली होती, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी उपस्थित केले आहेत. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या आत्महत्येनंतर त्याला धमक्‍या आल्या होत्या का? सुशांतच्या घरी आत्महत्येच्या आदल्या रात्री पार्टी झाली होती का? त्यात कोण उपस्थित होते? त्याने सीमकार्ड का बदलली होती, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे अंधेरी (प.) येथील आमदार अमित साटम यांनी उपस्थित केले आहेत. 

या संदर्भात आमदार साटम यांनी "झोन नऊ' चे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांना पत्र लिहून असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात या दिशेने तपास करून त्याचे निष्कर्ष जनतेसमोर मांडावेत, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे. 

सुशांतच्या आत्महत्येपूर्वी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेली त्याची मॅनेजर दिशा सॅलियन ही देखील मृत्यूपूर्वी वेगळ्या पार्टीत सहभागी झाली होती का, त्या पार्टीत आणखी कोण आले होते, या दोनही पार्टीला उपस्थित असलेल्यांच्या मोबाईलचे लोकेशन पडताळून याबाबत पोलिसांनी खात्री केली आहे का? या मुद्यांची चौकशी करावी, अशी मागणीही अमित साटम यांनी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यूसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारे संशयकल्लोळ सुरु आहे. सत्य जाणून घेण्याची जनतेची इच्छा आहे. या संदर्भातील काही मुद्यांची उत्तरे मिळाल्यास हे रहस्य उघड होऊ शकेल, असे सांगून साटम यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिशा सॅलियन हिच्या शवविच्छेदन अहवालात नेमके काय म्हटले आहे, कोणत्यातरी पार्टीनंतर तिने आत्महत्या केली का, त्या पार्टीत कोण हजर होते, मृत्यूपूर्वी चोवीस तास आधी ती कोणाला भेटली होती, याचा तपास झाला का, असे आमदार साटम यांनी पत्रात मुद्दे उपस्थित केले आहेत. 

दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतसिंह याला धमक्‍या आल्या होत्या का किंवा तो भितीच्या वातावरणात होता का, याबाबत त्याने आपल्या बहिणीला काही सांगितले होते का, हे जाणून घेण्यासाठी त्याच्या बहिणीचा जबाब नोंदविला आहे का? 

सुशांतने 8 जून पासून मृत्यूच्या दिवसापर्यंत वेगवेगळी सीमकार्ड का वापरली होती, सुशांतच्या आत्महत्येच्या आदल्या दिवशी त्याच्या घरी किंवा अन्यत्र झालेल्या पार्टीत तो होता का, त्या पार्टीत कोण होते, याचा शोध घेतला का, याबाबत इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचा जबाब घेतला का, सुशांतच्या व्हिसेराची फेरतपासणी करणार का, असे मुद्दे भाजपचे आमदार अमित साटम यांनी उपस्थित केले आहेत. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख