सोनू सुदने घेतली शरद पवारांची भेट - Sonu Sudane met Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

सोनू सुदने घेतली शरद पवारांची भेट

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

सोनू सूदच्या बांधकामावर नुकतेच मुंबई महापालिकेकडून आक्षेप घेण्यात आलाय. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचीही चर्चा आहे.

मुंबई : अभिनेता सोनू सूदनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांची भेट  सिल्वर ओकवर घेतली . भेटीमध्ये  सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचं सोनू सूदनं म्हटलयं.  त्याचप्रमाणे कोविड काळात केललेल्या कामाची माहितीही आपण पवारांना दिल्याचं तो म्हणाला. मात्र, सोनू सूदच्या बांधकामावर नुकतेच मुंबई महापालिकेकडून आक्षेप घेण्यात आलाय. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान तो सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे.

मुंबईसह देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना राज्यातील परप्रांतीय मजूरांसाठी अनेक प्रकारची मदत अभिनेता सोनू सूदने केली होती. मात्र, जुहू येथील एका निवासी इमारतीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून तिथं हॉटेल थाटल्याचा आरोप मुंबई महापालिका प्रशासनाने सोनू सुदवर केला आहे.  त्या साठी महापालिकेने त्याला नोटीस देखील बजावली आहे. बजावलेल्या नोटीसीला आता सोनूने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

महापालिकेने न्यायालयात दाखल केल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलय की सोनू सूदनं कोणताही परवाना न घेता एका निवासी इमारतीत निवासी हॉटेल सुरू करून मुंबई महापालिका कायद्याचं उल्लंघन केलं आहे. तसेच त्या इमारतीत बेकायदेशीर बदल करत एमआरटीपी कायदाही मोडला आहे. यासाठी पालिकेच्यावतीनं त्याला वारंवार नोटीसही बजावून कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरीही त्याचा व्यवसाय सुरूच आहे.

असा, आरोप करताना व्यावसायिक दराने नळ जोडणी घेणंही सोनूनं आवश्यक मानलं नाही, असं महापालिकेनं सांगितलं आहे. तसेच एमसीझेडएमएकडनं मिळवलेल्या एनओसीतील अटीशर्तीही पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे अशा याचिकाकर्त्याला कोणताही दिलासा न देता त्यानं केलेली याचिका मोठा 'आर्थिक दंड' आकारून फेटाळून लावावी अशी मागणी पालिकेनं आपल्या प्रतिज्ञापत्रातून केली आहे.

गेल्या सुनावणीत पालिकेनं आपली नोटीस आणि दिलेली तक्रार ही योग्य आणि कायदेशीरच असल्याचं ठामपणे कोर्टाला सांगितलं. पुढील सुनावणीत यासंदर्भातील सर्व कागदपत्र सादर करण्याचे निर्देश देत उच्च न्यायालयाकडून सोनू सूदला 13 जानेवारीपर्यंत सत्र न्यायालयानं दिलेला दिलासा कायम ठेवत पालिकेला कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश लिहो होते.

मात्र "जर तुम्ही स्वच्छ हातानं कोर्टात आला नसाल तर पुढे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील", या शब्दांत हायकोर्टानं सोनू सूदला इशारा दिला आहे. सोनू सूदच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोनू सुदनं पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. 

काय आहे प्रकरण?

सोनूने जुहू येथील 'शक्ती सागर' या निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे हॉटेल सुरू केल्याबद्दल पालिकेच्या 'के पश्चिम' विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गेल्यावर्षी 24 ऑक्टोबरला पालिकेच्या पथकाकडून तिथली पाहणीही करण्यात आली होती.

त्यावेळी तिथं मंजूर झालेल्या आराखड्यानुसार जागेचा वापर करण्यात आला नसून इमारत बांधकामात अनधिकृतपणे काही बदल केले असल्याचा ठपका सोनू सूदवर ठेवण्यात आला. याप्रकरणी पालिकेने सोनू सूदला नोटीसही पाठवली होती. त्यावर आता एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी सोनू सूदवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार 4 जानेवारी रोजी महापालिकेने जुहू पोलीस ठाण्यात दिली आहे.

रोहित पवारांनीही घेतली होती भेट ?

अभिनेता सोनू सूदनं लॉकडाऊन काळात गरजूंना मदत केली होती. सोनू सूदच्या या कामाचं कौतुक करण्यासाठी रोहित पवारांनी जून महिन्यात सूदच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ‘घर जाना हैं’ हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोहोचवणाऱ्या सोनू सूद यांची त्यांच्या घरी भेट घेतली” अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विटरवरुन दिली होती.

Edited By - Amol Jaybhaye
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख