अजितदादांकडे आता टोल्यांचे घड्याळ : शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा

गेल्या विधानसभा निवडणुकींतर सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पहाटे राजभवनावर शपथ घेतली होती. त्याचा संदर्भ घेत शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. "पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. शांत झोप लागणे हे 'फाइन' प्रकृतीचे लक्षण आहे. कधीच पूर्ण न होणाऱया स्वप्नांचा पाठलाग करणे हे कायम अशांत राहणाऱया मनाचे लक्षण आहे, असा चिमटा 'सामना'मधून काढण्यात आला आहे
Ajit Pawar, Sanjay Raut, Chandrakant Patil
Ajit Pawar, Sanjay Raut, Chandrakant Patil

पुणे : मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर 'घड्याळा'चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. सोबतीला 'हात' आहे. हातावर 'घड्याळ' आहे व घड्याळातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजित दादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घड्याळ भिंतीवर लावले आहे व ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच 'जागते रहा' च्या भूमिकेत आहेत,'' असे सांगत शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना चिमटा काढला आहे.

गेल्या शनिवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाली. त्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही भेट 'सामना'तील मुलाखतीसाठी होती हे दोन्ही नेत्यांनी सांगितले. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा राजकीय धुरळा उडवून दिला. त्याला 'सामना'च्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आले आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकींतर सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पहाटे राजभवनावर शपथ घेतली होती. त्याचा संदर्भ घेत शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. "पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. शांत झोप लागणे हे 'फाइन' प्रकृतीचे लक्षण आहे. कधीच पूर्ण न होणाऱया स्वप्नांचा पाठलाग करणे हे कायम अशांत राहणाऱया मनाचे लक्षण आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात 'पहाट' योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे,'' असे शिवसेनेने सुनावले आहे.

चंद्रकांतदादांना पहाटे पहाटे सध्या जाग येत आहे. त्यांची झोपमोड होते की, ते दचकून गचकन जागे होतात यावर पुढचे बरेच काही अवलंबून आहे. आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. असा आध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सूर्योदयास मांडला आहे. म्हणजे या मंडळींच्या डोक्यात काहीतरी वळवळते आहे, अशी शंकाही या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे. 

''महाराष्ट्रासह देशात शेतकऱ्यांत अशांतता आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी देशभरात सुरू केली आहेत. दिल्लीत शेतकऱयांनी प्रतीकात्मक ट्रक्टर जाळून निषेध केला आहे. कोरोनाचे संकटही आहेच. अकरा दिवसांत देशांत कोरोनाचे १० लाख नवे रुग्ण निर्माण होणे हे काही चांगले लक्षण नाही. सरकार आणि विरोधी पक्षांत या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी व अशी चर्चा ठरवून पहाटे पहाटे झाली तरी हरकत नसावी. राज्यात प्रश्नांचे डोंगर निर्माण झाले असताना राजकारणात उगाच फुसकुल्या सोडून प्रदूषण निर्माण करणे हे प्रगल्भतेचे लक्षण नाही. पाच वर्षे राज्य फडणवीस-पाटलांनीही चालवले आहे. त्यामुळे संकटकाळात काय करायचे व काय नाही याचे भान त्यांना असायला हवे,'' असेही शिवसेनेने भाजपला सुनावले आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com