जान कुमार सानूला BIG Boss मधून हाकला; प्रताप सरनाईकांची मागणी - Sena MLA Warns COLOURS over Jaan Kumar Sanu | Politics Marathi News - Sarkarnama

जान कुमार सानूला BIG Boss मधून हाकला; प्रताप सरनाईकांची मागणी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मनसेनेही जान सानूला थोबडवण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर काही वेळातच आता या वादात शिवसेनाही उतरली आहे.

मुंबई : मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मनसेनेही जान सानूला थोबडवण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर काही वेळातच आता या वादात शिवसेनाही उतरली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बाॅलीवूडमध्ये नेपोटिझम (घराणेशाही)चा मुद्दा गाजत आहे. बिग बाॅसच्या घरातही आता हा वाद सुरु झाला आहे. नाॅमिनेशनची प्रक्रिया सुरु असताना राहुल वैद्यने जान सानूला नाॅमिनेट करत घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला. जान सानूला आपले वडील गायक कुमार सानू यांच्यामुळे एंट्री मिळाल्याचे राहुल म्हणाल्यानंतर जान सानू संतापला. त्यावेळी अन्य अमराठी कलाकार व राहुल वैद्य यांची बाचाबाची झाली. त्यावेळी जान सानूने मराठीबाबत वक्तव्य केले. 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 'कलर्स' वाहिनीला अल्टीमेटम दिला आहे. ''जान कुमार सानूने राहुल वैद्यला  मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल असा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडा ओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेट  वर येऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करु," असे सरनाईक यांनी म्हटले आहे. बिग बाॅसचा निर्माता अभिनेता सलमान खान याने स्पर्धकांना योग्य ती समझ द्यावी, असेही आवाहन सरनाईक यांनी केले आहे. 

दरम्यान, मुंबईत राहून मराठी भाषेची चीड येते असे म्हणणाऱ्या जान कुमार सानूला आम्ही थोबडवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे. ''मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवणार लवकरच आता आम्ही मराठी.  आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,'' असे खोपकर यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख