Sanjay Raut is not work for Shiv Sena; They work for Pawar : narayan rane | Sarkarnama

संजय राऊत शिवसेनेचं नव्हे; पवारांचं काम करतात 

महेश जगताप 
गुरुवार, 16 जुलै 2020

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे राज्यातील नागरिकांचे लक्ष कोरोनाच्या मुख्य प्रश्नापासून हटविण्याचा प्रयत्न आहे. शिवसैनिकांना माहीत आहे की राऊत हे "सामना'मध्ये काम करीत असले तरी हे पूर्वीपासून पवाराचंच काम करीत आहेत. दिल्लीत हे सर्वाधिक काळ पवारांच्याच कार्यालयात असतात.

पुणे : "ज्येष्ठ नेते शरद पवार यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे राज्यातील नागरिकांचे लक्ष कोरोनाच्या मुख्य प्रश्नापासून हटविण्याचा प्रयत्न आहे. शिवसैनिकांना माहीत आहे की राऊत हे "सामना'मध्ये काम करीत असले तरी हे पूर्वीपासून पवाराचंच काम करीत आहेत. दिल्लीत हे सर्वाधिक काळ पवारांच्याच कार्यालयात असतात,' अशी टीका नारायण राणे यांनी आज (ता. 16 जुलै) घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांच्यावर केली. 

सत्तेचा दर्प देवेंद्र फडवणीस यांच्या डोक्‍यात गेला होता, या शरद पवारांच्या टीकेला राणे यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, फडणवीस यांच्यात घमेंड आहे, गर्व आहे, सत्तेची मस्ती आली, असं एकही उदाहरण दाखवून द्यावं. तरीही पवारांना असं का वाटावं हे मात्र कळत नाही. 

शिवसेनेमुळे भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार आले, हे कोणालाही न पटणारे पवार यांचे विधान आहे, असा टोलाही राणे यांनी लगावला. शरद पवार यांनी आजपर्यंत बऱ्याच वेळा शिवसेना जातीवादी पक्ष आहे, असे विधान केलेले आहे, मग तुम्ही जातीयवादी पक्षासोबत कसे आहात. तुमचे विचार कसे काय अचानक बदलले आणि तुम्ही एकत्र कसे आलात, असा प्रश्न राणे यांनी विचारला आहे. 

सामनातून शरद पवार यांची मॅरेथान मुलाखत हेच मुळात राजकारण आहे. सामनाने जेवढी पवारांवर टीका केली, तेवढी कोणीच केली नाही. अनेक वेळा खालच्या पातळीवर जाऊन पवार यांच्यावर टीका करण्यात आली आणि आज तुम्हीच पवार यांची सामनासाठी मुलाखत घेता, हे न पटणारी भूमिका आहे, असे राणे म्हणाले. 

राणे म्हणाले, "पवार यांनी मुलाखतीतून राज्याला कोरोनावर मात करण्यासाठी उपाय योजना सांगितल्या असत्या, तर बरं झालं असतं. पण, त्यांनी हे न करता राज्य सरकरची निष्क्रियता लपवण्यासाठी विरोधकांवर टीका करणे पसंत केले. पण, राज्यात कोरोनाचा कहर सर्वाधिक, मृत्यूदर जास्त, लोकांचे हाल होत आहेत, बेकारी वाढलीय. याबाबत कसलीच चिंता नाही.' 

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना, पिंजऱ्यात राहून राज्य कारभार करता येत नाही. राज्याचा गाडा हाकण्यासाठी घराबाहेर पडायला पाहिजे, तरच सरकार सुरळीतपणे चालवता येते. सरकार मंत्री चालवता की अधिकारी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी किती वेळा मातोश्रीवर जावं लागतं? असा प्रश्नही नाराय राणे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळेच हे कौरवांचं राज्य जाईल आणि लवकरच पांडवांचं सरकार येईल, असा आशावादही राणे यांनी व्यक्त केला. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख