Sanjay Raut criticizes the opposition on the occasion of Napanchami | Sarkarnama

संजय राऊत म्हणतात, ‘साँप तो यूही बदनाम है, मुझे तो लोग डसते है 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 25 जुलै 2020

शिवसेनेचे राज्यसभेचे सदस्य संजय राऊत हे कायम चर्चेतील नाव. मागील सहा महिन्यांपासून ते वृत्तवाहिन्यांवर दिसले नाहीत, असा एकही दिवस जात नाही. महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांच्यावरील वृत्तवाहिन्यांचा फोकस जरा वाढला आहे. राजकीय वर्तुळातून त्यांचे जसे कौतुक होत असते, त्या तुलनेत त्यांच्यावर बऱ्याचदा टीकाच होते. त्या टिकेला राऊत यांनी आज (ता. २५ जुलै) नागपंचमीचे निमित्त साधून उत्तर दिले आहे. 

पुणे : शिवसेनेचे राज्यसभेचे सदस्य संजय राऊत हे कायम चर्चेतील नाव. मागील सहा महिन्यांपासून ते वृत्तवाहिन्यांवर दिसले नाहीत, असा एकही दिवस जात नाही. पूर्वी आणि आताही ते देशपातळीवर पक्षाची भूमिका मांडत असतात.

महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांच्यावरील वृत्तवाहिन्यांचा फोकस जरा वाढला आहे. राजकीय वर्तुळातून त्यांचे जसे कौतुक होत असते, त्या तुलनेत त्यांच्यावर बऱ्याचदा टीकाच होते. त्या टिकेला राऊत यांनी आज (ता. २५ जुलै) नागपंचमीचे निमित्त साधून ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. 

ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात की, ‘साँप तो यूही बदनाम है, मुझे तो लोग डसते हैं, नाग पंचमी की शुभकामनाएं.’ अशा शब्दांत आपल्यावर वारंवार होणाऱ्या टिकेला त्यांनी उत्तर दिले आहे. 

 

राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी जो आग्रह धरला. त्याच्या अग्रभागी खासदार संजय राऊत हे होते. अमित शहा यांच्याशी बोलताना जे ठरलं, त्यानुसार अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यावे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर महिनाभर दररोज वृतवाहिन्यांना मुलाखती देत राऊत हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे ठामपणे सांगत होते आणि झालेही तसेच. 

शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी राऊत हे कशी सुत्रे हलवत होते, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. वेगवेगळी विचारसरणी असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांना एकत्र आणण्यात शरद पवार यांच्यासोबत संजय राऊत यांचीही भूमिका महत्वाची ठरली आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. तीन पक्ष एकत्र आल्याने राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले. तेव्हापासून भाजपचे नेते संधी मिळेल तेव्हा संजय राऊत यांच्यावर तुटून पडत असतात. राऊत यांच्यावर टीका करण्याची संधी पक्षातील नेत्यांपासून कार्यकर्ताही सोडत नाही. 

मध्यंतरी अजित पवारांच्या मदतीने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच शपथ घेऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी संजय राऊत शांतपणे सांगत होते की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. ज्या दिवशी फडणवीस आणि पवार यांनी शपथ घेतली. त्यादिवशी चंद्रकांत पाटील यांनी ‘संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. आतातरी त्यांना आवरा, आता तरी शांत बस ना बाबा,’ अशा शब्दांत टीका केली होती. 

तेव्हापासून सुरू असलेल्या टिकेला संजय राऊत यांनी आज नागपंचमीचे निमित्त साधून ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. ते म्हणतात की ‘साँप तो यूही बदनाम है, मुझे तो लोग डसते हैं.’ 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख