मुंबई महापालिका समित्यांच्या बैठकीत राष्ट्रगीत? वादाची ठिणगी - Row over Playing National Anthem in Mumbai Corporation Committee Meetings | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई महापालिका समित्यांच्या बैठकीत राष्ट्रगीत? वादाची ठिणगी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

महापालिकेच्या शाळा आणि सर्व समित्यांच्या बैठकांत वंदे मातरम गायन करावे, असा ठराव २०१७ मध्ये सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. भाजपचे संदीप पटेल यांनी ही ठरावाची सूचना मांडली होती. त्यावर प्रशासनाकडून अहवाल सर्वसाधारण सभेच्या पटलावर मांडला आहे.

मुंबई  : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेप्रमाणेच सर्व समित्यांच्या बैठकांच्या सुरुवातीला वंदे मातरम या राष्ट्रगीताचे समूहगायन होण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाने याबाबत निर्णय घेण्याबाबत शिफारस केली असून तसा अहवाल महासभेच्या पटलावर मांडण्यात आला आहे; मात्र यावरून वाद पेटण्याची शक्‍यता असून कोविड काळात शिवसेनेने भावनांचे राजकरण करू नये, असा सल्ला समाजवादी पक्षाने दिला आहे.

महापालिकेच्या शाळा आणि सर्व समित्यांच्या बैठकांत वंदे मातरम गायन करावे, असा ठराव २०१७ मध्ये सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. भाजपचे संदीप पटेल यांनी ही ठरावाची सूचना मांडली होती. त्यावर प्रशासनाकडून अहवाल सर्वसाधारण सभेच्या पटलावर मांडला आहे.

शाळांमध्ये 'जन गण मन...' आणि वंदे मातरम या राष्ट्रगीतांचे सामूहिक गायन केले जाते. त्यामुळे त्यासाठी नव्याने परवानगी देण्याची गरज नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे; तर सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी वंदे मातरम गायले जाते, त्याच धर्तीवर पालिकेच्या वैधानिक, विशेष समित्या तसेच प्रभाग समित्यांचे कामकाज सुरू करण्यापूर्वी या राष्ट्रगीताचे गायन करण्याबाबत महासभेने निर्णय घ्यावा, अशी शिफारस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या महिन्याच्या सर्वसाधारण सभेतील कामकाजात यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

भाजपचा अजेंडा शिवसेना राबवते
समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी यावरून शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. भाजपचा अजेंडा शिवसेना राबवत असून अशी सक्ती केली जाऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. त्याचबरोबर सध्याच्या साथीच्या काळात भावनिक राजकरण करण्याची गरज नसून कोव्हिड प्रतिबंधाचे उपाय करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Edited By- Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख