दाभोळ : दापोलीत बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत कार्यकर्त्यांबरोबरच खवय्यांमध्ये नाराजी पसरली आहे. चिकनवर ताव मारण्याचे दिवस असताना नवे संकट आल्याने कोंबडी मटणाचा आस्वाद बिनधास्तपणे घेता येणार नाही, हा नाराजीचा मोठा मुद्दा आहे. खाण्याच्या पर्वणीच्या काळात ही संक्रात आल्याने घास तोंडात अडकतोय, अशी स्थिती आहे.
१५ डिसेंबर २०२० रोजी मार्गशीर्ष महिना सुरू झाला होता, तो गुरुवार (ता. १४ जानेवारी) पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यानच्या काळात अनेक खवय्यांनी आपल्या जिभेवर संयम ठेवून गेले महिनाभर मांसाहार टाळला होता. मार्गशीर्ष कधी संपतो आणि चिकनवर कधी ताव मारतो, असे अनेकांना झाले होते. याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार ऐन जोमात सुरू आहे. कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी काहीजणांनी निवडणूक काळात व मार्गशीर्ष संपल्यानंतर मांसाहाराचा बेत आखला होता; मात्र या सर्व बाबींवर बर्ड फ्लूच्या दापोलीतील शिरकावामुळे सर्वांच्याच उत्साहावर पाणी फेरले गेले असल्याचे दिसून आले. एकीकडे कोरोनामुळे हवालदिल झालेले कोंबडी विक्रेते आता बर्ड फ्लूच्या संकटात अडकले आहेत. सामिष भोजनाची व्यवस्था करणाऱ्यांच्या मात्र ही परिस्थिती पथ्यावर पडली आहे.
..म्हणूनच चिकनपासून दूर
दापोलीमध्ये पाठोपाठ २ वेळा कावळे मरून पडलेले आढळले. ते तपासणीकरिता पाठवल्यावर बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या रोगाचा फैलाव झाल्याचे उघड झाले. हा रोग पसरल्यास त्याचे सर्वाधिक परिणाम कुक्कुटपालन व्यवसायाला व परिणामी कोंबडी खवय्यांना बसणार आहे. सध्या ते कसे खावेत, याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असल्या, तरी निवडणूक ज्वराच्या काळात त्यावर ताव मारणारे त्या किती पाळतील, याची शंकाच आहे. सध्या मात्र शंकित झाल्याने काहीजण त्यापासून दूर आहेत.
Edited By - Amit Golwalkar

