पायाला जखम झालेल्या पवारांच्या त्या फोटोची पुन्हा आठवण 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी केलेल्या कोकण दौऱ्याची आठवण ताजी झाली आहे.
 Remembering Sharad Pawar's Konkan tour last year
Remembering Sharad Pawar's Konkan tour last year

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी केलेल्या कोकण दौऱ्याची आठवण ताजी झाली आहे. पायाला जखम झालेली असूनही शरद पवार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनेची पाहणी केली होती. धरणाकडे चालत जात असतानाचा त्यांचा फोटो त्या वेळी सोशल मीडियामध्ये प्रचंड गाजला होता आणि ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी "टॉनिक' ठरले होते. 

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण (ता. चिपळूण) फुटून 23 जणांचा बळी गेला होता. त्या वेळी परिसरातील सात गावांचे आणि शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले होते. त्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आणि तेथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तातडीने रत्नागिरीचा दौरा केला होता. त्या वेळी पवार यांच्या पायाला जखम झालेली होती, तरीही त्यांनी तो दौरा केला होता. पायाला जखम असल्यामुळे त्यांना नीट चालता येत नव्हते. सहकाऱ्यांच्या मदतीने ते धरणाच्या वाहून गेलेल्या भरावापर्यंत पायी चालत गेले होते. त्यांचा चालतानाचा तोच फोटो त्या वेळी सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरला झाला होता. ते एक प्रकारे राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी "टॉनिक' ठरले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्या वेळी पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांना मदतही दिली होती. 

दरम्यान, तिवरे धरण हे खेकड्यांनी पोखरल्यामुळे फुटले, असे विधान तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. ते संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते. त्यावरून राज्यात मोठा गदरोळ उठला होता. एकीकडे तेव्हाचे सत्ताधारी अशी विधाने करीत असताना शरद पवार मात्र धरण फुटून नुकसान झालेल्या लोकांना भेटून दिलासा देण्याचे काम करीत होते. 

एकीकडे पायाला जखम झालेली असताना शरद पवार यांनी तिवरे धरणाची पाहणी केली आणि त्यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले. दुसरीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महा जनादेश यात्रा सुरू होती. तिवरे धरण फुटीकडे आणि कोल्हापूर, सांगली येथील पूर परिस्थितीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले होते. त्यावरून राज्यात भाजप-शिवसेनेवर टिकेची झोड उठवली जात होती. त्याच वेळी शरद पवार मात्र मोटारीने फिरून या पूरग्रस्तांना आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या लोकांना दिलासा देण्याचे काम करीत होते. 

आताही निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शरद पवार पुन्हा तातडीने मैदानात उतरले आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन यात त्यांचा हातखंडा आहे, त्यामुळे त्यांच्या अशा दौऱ्यांची नेहमीच चर्चा होत असते. 
 

शरद पवारांचा या जिल्ह्यांत पाहणी दौरा 

मुंबई : "निसर्ग' चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार हे आजपासून (ता. 9) दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते निसर्ग वादळामुळे तडाखा बसलेल्या गावांची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांना संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम ते करत आहेत. 

शरद पवार आज (ता. 9) रायगड, तर उद्या (ता. 10) रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. या वेळी ते शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. 

या दौऱ्यासाठी पवार हे सकाळी मुंबईतून गाडीने निघाले आहेत. सकाळी माणगाव, दुपारी 12.30 वाजता म्हसळा, एक वाजता दिवेआगार, दोन वाजता श्रीवर्धन येथील नुकसानाची पाहणी करणार आहेत. या वेळी ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर श्रीवर्धन येथे चार वाजता आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता हरिहरेश्वर येथे पाहणी करतील. त्यानंतर सहा वाजता बागमांडलामार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दापोली येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. 

दरम्यान या वेळी राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्याची सुरुवाती दापोली येथील नुकसानची पाहणी करून करणार आहेत. 

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रायगड जिल्ह्याचा दौरा केला असून त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा म्हणून पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com