Ramdas Athavale's criticism of Rahul Gandhi | Sarkarnama

नरेंद्र मोदी सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत : आठवले 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 जून 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरेंडर मोदी म्हणण्याचा बालिश आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला केला आहे. या टिकेला उत्तर देताना नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत, असे सांगत राहुल गांधी यांनी मात्र बालिश आरोप करणे सोडावे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरेंडर मोदी म्हणण्याचा बालिश आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला केला आहे. या टिकेला उत्तर देताना नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत, असे सांगत राहुल गांधी यांनी मात्र बालिश आरोप करणे सोडावे, असा प्रतिटोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरेंडर मोदी म्हटल्या प्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही आठवले यांनी केली आहे. 

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर कारस्थान करून चीनने हल्ला केला. या हल्ल्याचा प्रतिकार भारतीय जवानांनी केला. त्यात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले. चीनच्या धोकेबाज वृत्तीचा संपूर्ण भारत देश निषेध करीत असताना तसेच चीनच्या हल्ल्यात 20 जवान हुतात्मा झाल्याने देशवासियांच्या भावना तीव्र आहेत. अशा काळात देश एकसंघपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे.

भारतीय सैनिकांच्या शौर्याचा अभिमान बाळगून एकजुटीने भारत देश आज उभा आहे. अशा काळात कॉंग्रेस नेते राहुल गांधी चुकीची, बालिश वक्तव्ये करीत आहेत. राहुल गांधींच्या बालिश वक्तव्यामुळेच कॉंग्रेस पक्षाचे नुकसान होत आहे, असा दावा आठवले यांनी केला. 

गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी राफेल कराराचा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापवून मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. मात्र, या आरोपांना जनतेने उलटवून लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भरघोस पाठिंबा देत भाजपचे 303 खासदार निवडून दिले. भाजपला अभूतपूर्व विजय जनतेच्या पाठिंब्याने मिळाला. 

मोदींच्या नेतृत्वावर त्यांच्या प्रामाणिकतेवर त्यांच्या कर्तृत्वावर जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केले. राफेल आरोपावेळी राहुल गांधी जनतेच्या न्यायालयात बालिश ठरले आणि आताही चीन विरोधात देशाची एकजूट दाखवण्याच्या काळात राहुल गांधी बालिश वक्तव्य करीत आहेत. त्यांचा हा बालिशपणा कॉंग्रेसला गोत्यात घालणारा आहे. 

चीनी सैनिकांनी केलेले आक्रमण भारताच्या शूर सैनिकांनी परतवून लावले आहे. आपल्या शूर सैन्याचा राहुल गांधी यांनी अभिमान बाळगला पाहिजे. या काळात पंतप्रधानांवर चुकीची बालिश टीका करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुरंधर मोदी आहेत, त्यांना सरेंडर मोदी म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख