रामदास आठवले या निर्णयाबद्दल धनंजय मुंडे यांच्याशी बोलणार 

आत्मनिर्भर भारत अभियानद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्या अंतर्गत 3 लाख कोटींचे पॅकेज कुटीर उद्योग; सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना देण्यात येणार आहे. त्या योजनेचा लाभ मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना मिळवून देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.
 Ramdas Athavale will talk to Dhananjay Munde about this decision
Ramdas Athavale will talk to Dhananjay Munde about this decision

मुंबई  : आत्मनिर्भर भारत अभियानद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्या अंतर्गत 3 लाख कोटींचे पॅकेज कुटीर उद्योग; सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना देण्यात येणार आहे. त्या योजनेचा लाभ मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना मिळवून देणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. 

मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या महासंघातर्फे केंद्रिय राज्यमंत्री आठवले यांचा वेबसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मागासवर्गीय उद्योजकांना मार्गदर्शन करताना आठवले बोलत होते. या वेबसंवादाचे आयोजन रिपब्लिकन पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा मागासवर्गीय संस्था महासंघाचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी केले होते. या वेळी महासंघाचे मोहन माने, प्रमोद कदम, गौतम गवई आदींनी वेब संवादात सहभाग घेतला. या वेळी राज्यातील 372 मागासवसर्गीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय औद्योगिक संस्थांचा अखर्चिक निधी परत मागविण्याचा घेतलेला निर्णय योग्य नाही. त्याबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी आपण बोलणार असल्याचे रामदास आठवले या वेळी म्हणाले. मागासवर्गीय संस्थांनी आपल्या संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवावा. संस्थेस कोणतेही गालबोट लागू देऊ नये; संस्थेत अनियमितता येऊ देऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करून मागासवर्गीय संस्थांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. 

सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकारतर्फे व्हेंचर कॅपिटल स्कीम मागसवर्गीय उद्योजकांसाठी राबविण्यात येते. त्या योजनेद्वारेही मागासवर्गीय उद्योजकांना उद्योगांचा विस्तार करण्यात येईल, अशी सूचना या वेळी आठवले यांनी केली. 

रिपब्लिकन पक्षाच्या "या' नेत्याच्या घरावर गोळीबार 

नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष शकील सैफी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. शकील सैफी यांच्या दिल्लीतील नांगलोई निहाल विहार येथील घरावर अज्ञात तीन व्यक्तींनी अंधाधुंद गोळीबार केला. शकील सैफी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

या हल्ल्यात शकील सैफी बचावले आहेत. त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या पायावर तीन गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला आहे. या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा कसून शोध घेऊन त्वरीत अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. आज त्यांनी हल्ला झालेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शकील सैफी यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर असल्याचे सांगत धीर दिला. 

रिपाइं( आठवले) पक्षात अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीत शकील सैफी उत्कृष्ट समाजकार्य करीत आहेत. मात्र, काल अज्ञात हल्लेखोरांनी शकील सैफी यांच्यावर हल्ला करण्याचा उद्देशाने त्यांच्या घरावर गोळीबार केला. या प्रकरणी येथील पोलिस आयुक्त सागर यांची भेट घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com