प्रार्थनास्थळे सुरु करणे हे उशीरा सुचलेले शहाणपण - आठवलेंची टीका - Ramdas Athavale Criticized Government over starting up of Temples | Politics Marathi News - Sarkarnama

प्रार्थनास्थळे सुरु करणे हे उशीरा सुचलेले शहाणपण - आठवलेंची टीका

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

मुंबई : महाराष्ट्रात सर्वधर्मीय  प्रार्थनास्थळे सुरू करावीत या साठी रिपब्लिकन पक्षाने राज्यभर आंदोलन केले होते. उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेऊन राज्य सरकार ने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

कोरोना चा प्रसार होऊ याची खबरदारी घेऊन सर्व नियम पाळून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी होती. त्यासाठी रिपाइं ने राज्यभर आंदोलन केले. दिवाळी पाडव्या पासून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय हे राज्य सरकार ला उशिरा सुचलेले शहाणपण असले तरी या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे आठवले म्हणाले. 

पत्रकारांनाही लोकलमध्ये प्रवेश द्या

लोकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून प्रेसकार्डधारक पत्रकारांचा समावेश करण्यात आला. मात्र अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वे प्रवासात प्रेसकार्ड धारक पत्रकारांचाही राज्य सरकार ने समावेश करावा, या मागणी चे पत्र आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले असुन त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगत अधिस्वीकृतीधारक आणि प्रेसकार्ड धारक पत्रकार असा भेद करून श्रमिक पत्रकार कॅमेरामन यांच्यावर होणारा अन्याय राज्य सरकार ने दूर करावा अशी मागणी आठवले यांनी केली आहे. 

दरेकरांनीही केली टीका

अशीच टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही केली आहे. महाराष्ट्रातील लाखो वारकरी, हिंदुत्वप्रेमी जनता, मंदिरावर उपजिविका अवलंबून असणा-यांची ही मागणी होती. त्यांचा रेटा व दबाव सरकारवर होता, त्यामुळेच उशिरा को होईना सरकारला निर्णय घ्यावा लागला. त्याचे स्वागत आहे पण हा निर्णय अगोदरच व्हायला हवा होता. मंडई, मॉल्स, रेस्टॉरन्टस, बार, जीम्स, व अन्य सार्वजनिक स्थळे खुली केली होती. वारकरी सांप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने मंदिरे उघडण्याची भूमिका मांडली होती, त्यामुळे सरकारने आधीच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. पण केवळ अहंकार व प्रतिष्ठेमुळे सरकारने हा निर्णय घेतला नाही. कोरोनाचे संकट असताना मंदिरे उघडल्यामुळे जनतेला दिलासा मिळेल, त्यामुळे जनेतेने सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन दरेकर यांनी केले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख