Ram Kadam criticizes the state government | Sarkarnama

रुग्ण तडफडून मरत असताना यांना चिंता सत्तेच्या खाटाची : कदम

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 16 जून 2020

सामनाच्या आजच्या "खाटा का कुरकुरताय' या अग्रेलखामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोपांची राजकीय धुळवड सुरू झाली आहे. या अग्रलेखातून शिवसेनेने कॉंग्रेसला उपदेश दिले आहेत. या वादात आता भारतीय जनता पक्षानेही उडी घेतली आहे. भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी या अग्रेलखावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : सामनाच्या आजच्या "खाटा का कुरकुरताय' या अग्रेलखामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोपांची राजकीय धुळवड सुरू झाली आहे. या अग्रलेखातून शिवसेनेने कॉंग्रेसला उपदेश दिले आहेत. या वादात आता भारतीय जनता पक्षानेही उडी घेतली आहे. भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी या अग्रेलखावर प्रतिक्रिया दिली आहे. "राज्यात कोरोनाचे रुग्ण तडफडून मरत असताना महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मात्र सत्तेच्या खाटांची आणि खुर्चीची पडली आहे,' अशा शब्दांत त्यांनी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारवर हल्ला चढवला आहे. 

आमदार कदम म्हणतात की, मुंबई आणि राज्यात अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये खाटा मिळत नाहीत; म्हणून अनेकांचा तडफडून मृत्यू होत आहे. मात्र तीन पक्षांच्या या सरकारला सत्तेच्या खाटांचे आणि खुर्चीचे पडले आहे. आज लॉकडाउन होऊन 83 दिवस झाले तरी या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील एका गोरगरिबाला, शेतकऱ्याला एका पैशाचीही मदत केलेली नाही. कोरोनासारख्या महामारीवर ठोस उपाय योजना करण्याऐवजी कोमट पाणी प्या असे फुकटचे सल्ले आणि या तीन पक्षांची भांडणे याशिवाय या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला काहीही दिलेले नाही. 

"आजचा सामनाचा अग्रलेख वाचल्यानंतर असा प्रश्‍न पडतो आहे की महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांना काही स्वाभिमान आहे की नाही. आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की सरकारने गंभीर व्हावे. स्वतःच्या खुर्चीची चर्चा नंतर करावी. त्या अगोदर ज्या गोरगरिबांना हॉस्पिटलमध्ये खाटा मिळत नाहीत, त्या खाटांची आणि महाराष्ट्रात ज्यांची उपासमार सुरू आहे, त्याची चिंता करावी,' असे आवाहन आमदार राम कदम यांनी राज्य सरकारला केले आहे. 
 

मोदी, ठाकरे यांची निर्णयक्षमता संपली : प्रकाश आंबेडकरांची टीका 

अकोला : देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही, हे आता कोविड- 19च्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे. तीच गत महाराष्ट्राची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला. 

राज्यात शाळा चालू करायच्या की नाहीत, हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अधांतरी होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र हा निर्णय जिल्हा पातळीवर ढकलून दिला आहे. याचाच अर्थ यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही. राजकीय नेतृत्व नाही, दूरदृष्टी नाही आणि बेभरवशावर हे राज्य सोडून दिले आहे. ही अवस्था "जाणता राजा'ची पण असल्याची खरमरीत टीका डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

हेही वाचा : चीनी सैन्याच्या हल्ल्यात कर्नलसह दोन सैनिक शहीद 

केंद्रात नरेंद्र मोदी नेतृत्व करू शकत नाही, ते निर्णय घेऊ शकत नाही, आपले निर्णय राज्यावर सोडून देतात आणि राज्यातले लोक जिल्ह्यावर निर्णय सोडून देतात. हे शाळाबाबतच्या निर्णयावरून दिसून आले आहे. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो. सरकारला आमची विनंती आहे की, शाळा सुरू करायच्या की नाही, हा निर्णय लवकर घ्या, नाही करायच्या असतील तर तसे स्पष्ट सांगा, करायच्या असतील तर केव्हा करणार, याचे वेळापत्रक जाहीर करा, वेळापत्रक जाहीर करताना जर तरची भाषा वापरायची नाही, असेही डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख