राहुल गांधी अन् ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह राजीव सातव यांची 'ती' भेट राहून गेली!

''राजीव सातव म्हणजे वचनाला जागणारे नेते होते.''
Rajiv Satav could not meet again says Shrimant Kokate
Rajiv Satav could not meet again says Shrimant Kokate

मुंबई : ''राजीव सातव म्हणजे वचनाला जागणारे नेते होते. राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह जेवणाची वेळ त्यांनी ठरल्याप्रमाणे घेतली होती. पण आम्हाला वाटले होते, ते सहज बोलले असतील. पण पुण्याकडे येण्यासाठी विमानतळावर पोहचलो होतो. ते खूप नाराज झाले. शेवटी त्यांच्यासोबतची ती भेट राहून गेली,'' अशी आठवण विचारवंत डॅा. श्रीमंत कोकोटे यांनी सांगितली. (Rajiv Satav could not meet again says Shrimant Kokate)

राजीव सातव यांच्या निधनानंतर डॅा. कोकाटे यांनी काही आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, ''2017 साली आम्ही दिल्लीला गेलो होतो (प्रवीणदादा गायकवाड, अजयसिंह सावंत). त्यावेळेस संसदेचे अधिवेशन सुरू होते. त्यामुळे अनेक खासदारांच्या भेटी घेतल्या. त्यापैकी एक म्हणजे अॅड. राजीव सातव यांना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो. तेव्हा ते पंजाब येथील एका शिष्टमंडळाबरोबर चर्चा करत होते. आम्ही त्यांना आल्याची कल्पना दिल्याबरोबर त्यांनी आमची स्वतंत्र खोलीमध्ये बसण्याची व्यवस्था केली आणि मीटिंग संपून आलोच असा निरोप दिला. मिटिंग संपवून ते आले. आमची ही पहिलीच भेट होती, परंतु आम्ही खूप जुने मित्र आहोत, अशा पद्धतीने ते बोलू लागले.'' 

"मी तुमची भाषणे युट्युब वर नियमित ऐकतो, तुम्ही मंडळी करत असलेले काम खूप महत्वपूर्ण आहे, या विचाराची समाजाला खूप गरज आहे " असे ते खूप भरभरून बोलत होते. दरम्यान, चहापाणी, नाश्ता झाला. त्यांनी खूप जेवणाचा आग्रह केला, परंतु आम्ही नियोजित ठिकाणी जेवणासाठी जाणार होतो, परंतु त्यांनी आग्रह केला की, " आपण मान. राहुल गांधी, खा. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह परवा डिनरला बसू, मी त्यांची वेळ घेतो. उद्या मी गुजरातला एक दिवसासाठी जाऊन येणार आहे, तरी परवा आपण नक्की भेटू" असे ते म्हणाले. आम्ही जाण्यासाठी निघालो, तेव्हा ते त्यांच्या बंगल्याच्या गेटपर्यंत सोडवायला आले. आम्ही त्यांना म्हणत होतो "आम्ही जातो. आपण थांबा. तुम्हाला खूप लोक भेटण्यासाठी आलेले आहेत." तेव्हा ते आग्रहपूर्वक सोबत आले,'' असे कोकाटे यांनी सांगितले.

''सातव यांचे आतिथ्य, त्यांची सौजन्यशीलता, इतक्या मोठ्या पदावर असून देखील कमालीची विनयशीलता, त्यांचा पक्षाप्रती, नेत्याप्रती, कार्यकर्त्याप्रती, जनतेप्रती असणारा प्रामाणिकपणा पदोपदी ठळकपणे दिसत होता. आम्ही त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर तिसर्‍या दिवशी पुण्यासाठी आमचे फ्लाइट असल्यामुळे आम्ही सुमारे बारा वाजता दिल्ली विमानतळावर पोचलो. विमानतळावर पोचल्याबरोबर राजीव सातव यांचा फोन आला की संध्याकाळी राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबरोबर ठरल्याप्रमाणे आपल्याला डिनरसाठी बसायचे आहे, तरी तुम्ही या. त्यावेळेस आम्ही सांगितले की, आम्ही पुण्यासाठी निघालो आहोत आणि आता दिल्ली विमानतळावर आहोत. राजीव सातव साहेबांनी खूप आग्रह केला "विमानाचे तिकीट कॅन्सल करा, उद्या जावा"  परंतु आम्ही नियोजित कार्यक्रम असल्यामुळे पुण्याला परत आलो,'' अशी आठवण कोकाटे यांनी सांगितली.

आम्हाला वाटले होते की, परवा राजीव सातव सहज बोलले असतील आणि अधिवेशन काळात राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे भेटणे शक्य होईल का? पण राजीव सातव हे दिलेल्या शब्दाला जागणारे नेते होते. राजीव सातव यांना परत येण्याचे आश्वासन दिले. ते खूप नाराज झाले. त्यांची इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार पेरणाऱ्या, निर्भीडपणे लढणाऱ्या तरुणांची ओळख व्हावी आणि पुढे आपल्याला कसे जाता येईल याबद्दल चर्चा करावी हे त्यांचे नियोजन होते. राजीव सातव म्हणजे दिलेल्या वचनाला जागणारे, देशभर प्रचंड जनसंपर्क असणारे, पक्षासाठी, लोकांसाठी सतत झटणारे अत्यंत प्रेमळ, प्रामाणिक, संवेदनशील धडपडणारे, लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. आक्रस्ताळेपणा नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, आकस नाही अशा युवक नेत्याचा मृत्यू मनाला वेदना देणारा आहे. आजकाल साधी आमदारांची कोण ओळख करून देत नाही, पण राजीवजी आमची ओळख राष्ट्रीय नेत्यांशी करून देत होते. इतके ते मोठ्या मनाचे होते. शेवटी त्यांच्यासोबतची ती भेट राहून गेली, याचे शल्य कायम राहील, अशी भावना कोकाटे यांनी व्यक्त केली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com