पुणे : धावपट्टीच्या देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी पुणे विमानतळावरून तीन महिन्यांपासून रात्री 8 ते सकाळी 8 या कालावधीत विमान उड्डाणे होत नाहीत. आता 26 एप्रिल ते 9 मे या चौदा दिवसांमध्ये विमानतळ पुर्णपणे बंद ठेवले जाणार आहे. या कालावधीत विमानतळावरून एकाही विमानाचे उड्डाण होणार नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
पुणे विमानतळ हे हवाई दलाचे असून त्यांच्याकडून धावपट्टीची देखभाल-दुरूस्ती केली जात आहे. दि. २६ आॅक्टोबरपासून हवाई दलाकडून धावपट्टीच्या देखभाल-दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम दररोज रात्री ८ ते सकाळी ८ यावेळेत सुरू आहे. सुमारे वर्षभर हे काम चालणार असल्याचे पुणे विमानतळ प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे.
As per information received from IAF, due to runway resurfacing works, Pune Airport will have no flight operations for 14 days from 26th April 2021 till 09 May 2021.
— PuneAirport (@aaipunairport) January 31, 2021
रात्रीच्या वेळेत एकाही विमानाचे उड्डाण होत नसल्याने विमान कंपन्यांना त्यानुसार वेळापत्रकात बदल करावा लागला. त्यामुळे दिवसा होणाऱ्या उड्डाणांवर परिणाम झाला. लॉकडाऊनपूर्वी विमानतळावर दररोज सुमारे 150 ते 160 विमानांची ये-जा होत होती. सध्या हा आकडा निम्म्यापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. कोरोनाच्या निर्बंधांचा फटकाही बसत आहे.
सध्या पुणे विमानळावरून दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बेंगलुरू, नागपुर, कोची, लखनौ, हैद्राबाद आदी शहरांमध्ये विमानांची ये-जा सुरू आहे. त्यातच आता दि. 26 एप्रिल ते 9 मे या कालावधीत विमानतळावरून एकाही विमानाचे उड्डाण होणार नसल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने ट्विटरवरून दिली आहे. भारतीय हवाई दलाकडून ही माहिती देण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, विमानतळ बंद राहणार असल्याने प्रवाशांना या कालावधीतील प्रवासाचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. प्रवाशांना मुबई विमानतळाचाच पर्याय निवडावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणेदरम्यानचा प्रवास वाहनाने करावा लागेल.
Edited By Rajanand More

