शंकरराव चव्हाण बातम्यांमधूनही कडक शिस्तीचे वाटायचे : उद्धव ठाकरे 

शंकरराव चव्हाण यांच्या मुशीत आणि कडक शिस्तीत घडलेले अशोक चव्हाण हे माझ्या मंत्रिमंडळात सहकारी असल्याचा आनंद आहे. मी शाळेत असताना शंकररावांना पाहिले होते. त्यांच्या बातम्यांमधूनही त्यांची शिस्त डोकावायची, माणूस कडक वाटायचा,अशा आठवणीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितल्या.
Publication of Gaurav Granth on Shankarrao Chavan by Chief Minister Thackeray
Publication of Gaurav Granth on Shankarrao Chavan by Chief Minister Thackeray

मुंबई : "जनसेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, असे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री (स्व.) डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचे मार्गदर्शन घेऊन, त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतिपथावर नेणार आहे,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

दरम्यान, "शंकरराव चव्हाण यांच्या मुशीत आणि कडक शिस्तीत घडलेले अशोक चव्हाण हे माझ्या मंत्रिमंडळात सहकारी असल्याचा आनंद आहे. मी शाळेत असताना शंकररावांना पाहिले होते. त्यांच्या बातम्यांमधूनही त्यांची शिस्त डोकावायची, माणूस कडक वाटायचा,' अशा आठवणीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितल्या. 

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री (स्व.) डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 100 व्या जयंती दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या वेळी उपस्थित होते. 

डॉ. स्व. चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या "आधुनिक भगीरथ' या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

ठाकरे म्हणाले की, चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेला आधुनिक भगीरथ हा गौरवग्रंथ तळागाळापर्यंत पोचला पाहिजे. ग्रंथातील विचारांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा मार्ग दिसत असतो. लोकराज्याच्या विशेषांकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली, तरी त्यांचे सर्वस्पर्शी नेतृत्व दिसून येते. 

शंकरराव चव्हाण कडक शिस्तीचे होते, त्यामुळे त्यांना हेडमास्तर म्हटले जाई. त्यांनी सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरणक करणे असो किंवा भोंगा वाजवून वेळेत काम सुरू करण्याची कल्पना असो, त्यांचे कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. आजच्या युगात असे व्यक्तिमत्त्व सापडणे कठीण आहे, असे त्यांनी सांगितले. 

गौरवग्रंथ गावपातळीपर्यंत पोचावा : नाना पटोले 

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्य निर्मितीनंतर विविध योजना आणून राज्याचा विकास करण्याचे कार्य माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, स्व. शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी केले. स्व. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नवीन पिढीला व्हावे यासाठी "आधुनिक भगीरथ' हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा ग्रंथ गावपातळीपर्यंत पोचून त्यांचे विचार राज्याच्या तळागाळात जायला हवे. 

चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून विद्युत प्रकल्प, धरणांची निर्मिती : अजित पवार 

यंदा राज्याचा हीरक महोत्सव आणि माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण होणे, ही गरज आहे. स्व. चव्हाण यांच्यावरील गौरव ग्रंथ व लोकराज्यच्या विशेषांकातील मान्यवरांचे विचार आणि स्व. चव्हाण यांच्याबद्दलची माहिती ही केवळ त्यांची वैयक्तिक माहिती नसून राज्याच्या सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, सांस्कृतिक जडणघडणीचे चित्र आहे. वीज, शेती, पाटबंधारे आदी क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या दूरदृष्टितूनच राज्यात विद्युत प्रकल्प व धरणांची निर्मिती झाली. देशाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयात मोलाचा सल्ला देण्याचे काम त्यांनी केले. लोकांसाठी योग्य असेल तेच बोलणे व त्यासाठीच काम करणारे नेते म्हणून स्व. चव्हाण ओळखले जातात. त्यांचा हा वारसा अशोक चव्हाण यांनाही मिळाला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

जन्मशताब्दीनिमित्त अनेक कामे सुरू : अशोक चव्हाण 

मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, माजी गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सर्व पक्षातील नेत्यांची चांगले संबंध होते. माजी मुख्यमंत्री स्व. चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य सरकारने अनेक विकास कामे सुरू केली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे, भोकर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र उभारणे, जल संवर्धनात काम करणाऱ्यांसाठी जलपुरस्कार देणे आदी उपक्रम राबविले आहेत. "आधुनिक भगीरथ' हा गौरव ग्रंथ आणि लोकराज्याचा विशेषांक हे वाचनीय व संग्राह्य झाले आहेत. 

जल नियोजनातील काम अतुलनीय : देवेंद्र फडणवीस 

शंकरराव चव्हाण यांनी राज्याच्या प्रशासनाला वेगळी दिशा दिली. कठोर प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगता येतील. चव्हाण यांनी जल नियोजनातील काम हे अतुलनीय आहे. जायकवाडी, उजनी सारखी धरणे ही त्यांच्या उत्तम जलनियोजनाची उदाहरणे आहेत. जल नियोजनातून पाण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे त्यांच्या गौरव ग्रंथाला दिलेले "आधुनिक भगीरथ' हे नाव सार्थ आहे. देशाच्या व राज्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

या वेळी मराठी भाषा राज्यमंत्री विश्वजित कदम, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार भाई जगताप, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, ज्येष्ठ पत्रकार संतोष पंडागळे आदी यावेळी उपस्थित होते. 

मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे यांनी प्रास्ताविकात स्व. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांची तसेच गौरव ग्रंथाची माहिती दिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी आभार मानले. 

या विशेषांकात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांचा सहवास लाभलेले माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील-चाकूरकर आदी दिग्गज नेत्यांच्या मनोगतांचाही या अंकात समावेश आहे. त्याचबरोबर इतर जाणकारांच्या लेखांतून डॉ. चव्हाण यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख होणार आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com